Friday, 22 Jan, 10.10 pm लेटेस्ट ली

महाराष्ट्र
Serum Institute Fire: सीरम इन्स्टिट्यूट येथे लागलेल्या आगीत 1000 कोटींचे नुकसान; कंपनीने घेतली मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाची जबाबदारी- CEO Adar Poonawalla

SII CEO Adar Poonawalla | (Photo Credits: ANI)

गुरुवारी जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'च्या (Serum Institute of India) पुणे प्लांटमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या दुसर्‍याच दिवशी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आणि मालक अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी सांगितले की, या आगीत कंपनीचे एक हजार कोटींचे नुकसान झाले आहे. मात्र, ते म्हणाले की कोव्हिशिल्ड लसीचे कोणत्याही प्रकारे नुकसान झालेले नाही आणि त्याच्या उत्पादनावरही परिणाम झाला नाही. अदार पूनावाला यांनी हेही सांगितले की, ज्या ठिकाणी आग लागली होती तेथे लस तयार केली जात नव्हती, ती जागा म्हणजे फक्त भविष्यातील नियोजन होते.

ज्या ठिकाणी आग लागली तिथे भविष्यात बीसीजी आणि रोटाव्हायरस लस तयार केली जाणार होती, त्यामुळे आता त्याच्या उत्पादनावर या आगीचा परिणाम होऊ शकतो. पुण्यातील मांजरीस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या नवीन प्लांटमध्ये ही आग लागली होती. गेल्या वर्षी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते या प्लांटचे उद्घाटन झाले होते, परंतु या प्लांटमध्ये लसीचे उत्पादन सुरू झाले नव्हते. काल दुपारी साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. ( Fire At Nashik Municipal Corporation: नाशिक महापालिकेत विरोधी पक्षनेता, गटनेता कार्यालयाला आग; आग आटोक्यात आणण्यात यश)

आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या निर्माणाधीन इमारतीला भेट दिली, जिथे आगीच्या घटनेत पाच जण ठार झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आगीचे नेमके कारण शोधले जात आहे. जोपर्यंत चौकशी अहवाल येत नाही, तोपर्यंत याबाबत कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सीरम कंपनीने घेतली आहे. त्याशिवाय काही आवश्यकता असेल तर शासन निश्चित मदत करेल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top