Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आई-वडिलांनी मुलीला रुग्णालयात नेलं अन् सगळेच हादरले; बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार

आई-वडिलांनी मुलीला रुग्णालयात नेलं अन् सगळेच हादरले; बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार

Letsupp 1 month ago

15 वर्षांच्या शाळकरी मुलगी गरोदर (Ashti) असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आणि काही वेळातच तिने बाळाला जन्म दिला. पण या घटनेनं सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. अधिक चौकशी केली असता भयानक वास्तव पुढं आलं असून बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

आता पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.

पीडित मुलगी आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीड-अहिल्यानगर महामार्गालगत असलेल्या एका शाळेत शिक्षण घेत आहे. साधारण वर्षभरापूर्वी ती नेहमीप्रमाणे शाळेतून घरी जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान, एका अज्ञात नराधमाने तिला ‘गावात सोडतो’ असं आमिष दाखवून स्वतःच्या वाहनात बसवलं. त्यानंतर तिचे डोळे बांधून तिला महामार्गाच्या कडेला असलेल्या एका निर्जन स्थळी नेण्यात आलं. तिथे तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला. या भयंकर प्रसंगानंतर आरोपीने तिला धमकी दिल्याने घाबरलेल्या मुलीने घरच्यांना काहीच सांगितलं नव्हतं.

बीडमध्ये विलास घुले प्रकरणावरून राजकारण; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचं मात्र मौन

गेल्या वर्षभरापासून पीडित मुलगी या मानसिक आणि शारीरिक त्रासाला तोंड देत गुपचूप जगत होती. परंतु, दोन दिवसांपूर्वी तिच्या पोटात अचानक तीव्र कळा येऊ लागल्या. मुलीची प्रकृती बिघडल्याचे पाहून पालकांनी तिला पोटदुखीच्या उपचारासाठी तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात नेलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता, ती पूर्ण दिवसांची गरोदर असल्याचं निष्पन्न झालं. काही वेळातच तिची प्रसूती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला. डॉक्टरांनी हा संवेदनशील प्रकार ओळखताच तात्काळ अंभोरा पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.

डॉक्टरांकडून माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी वेगाने पावले उचलली आणि पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला. तपासाची चक्रे फिरवत अज्ञात नराधमाविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नवीन कायद्यानुसार भारतीय न्याय संहितेचे कलम 65 (1) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच ‘पोक्सो’ (POCSO) च्या कलम 4 आणि 8 अन्वये गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इतक्या भयानक गुन्ह्याचा वाटेकरी कोण आहे? याचा माग काढण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp