Dailyhunt
आनंदाची बातमी; वारंवार रेशन दुकानांच्या फेऱ्या टळणार, एप्रिल महिन्यातच तीन महिन्यांचं धान्य मिळणार

आनंदाची बातमी; वारंवार रेशन दुकानांच्या फेऱ्या टळणार, एप्रिल महिन्यातच तीन महिन्यांचं धान्य मिळणार

Letsupp 1 week ago

Frequent visits to ration shops will be avoided : राज्यभरातील रेशनकार्डधारकांसाठी राज्य सरकारने एक मोठा दिलासादायक आणि नागरिकांभिमुख निर्णय जाहीर केला आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आणि एप्रिल, मे आणि जून या कालावधीत तापमानाचा वाढता कडाका लक्षात घेऊन, प्रशासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्याचे धान्य आता एप्रिल महिन्यातच एकत्रित स्वरूपात वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.

या तीव्र उन्हात विशेषतः वृद्ध, महिला आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कष्टकरी वर्गाला रेशनसाठी वारंवार दुकानांवर जावे लागत होते. अनेक वेळा लांबच लांब रांगा, उन्हाचा तडाखा आणि वेळेची अडचण यामुळे नागरिक त्रस्त होत होते. मात्र, या नव्या निर्णयामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, वारंवार रेशन दुकानात जाण्याची गरज भासणार नाही.

शासनाच्या या निर्णयानुसार, पात्र लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याच्या कोट्यासोबतच मे आणि जून महिन्यांचे धान्य देखील आगाऊ दिले जाणार आहे. तांदूळ आणि गहू हे शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणानुसार वितरित केले जातील. यासाठी जिल्हास्तरावर आवश्यक ते नियोजन पूर्ण झाले असून, सर्व रेशन दुकानांवर पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे वितरण प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी प्रशासनाने घेतली आहे.

हा निर्णय विशेषतः अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब या गटातील रेशनकार्डधारकांसाठी लागू करण्यात आला आहे. समाजातील अत्यंत गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हा निर्णय मोठा आधार ठरणार आहे. यामुळे त्यांचा वेळ, श्रम आणिआर्थिक ताण कमी होणार असून, सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने देखील हा एक महत्वाचा निर्णय मानला जात आहे.

दरम्यान, धान्य वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने ई-पॉस प्रणाली अनिवार्य केली आहे. लाभार्थ्यांना रेशन घेताना बायोमेट्रिक पद्धतीने अंगठ्याचा ठसा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. अंगठ्याचा ठसा नोंदवल्याशिवाय धान्य दिले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी स्वतः उपस्थित राहून ओळख पडताळणी करूनच धान्य घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

एकूणच, कडक उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा देणारा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा प्रत्यय देणारा हा निर्णय ठरत असून, राज्यभरातील लाखो रेशनकार्डधारकांना याचा थेट लाभ होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp