Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'बंडखोर'च्या टीमने अनुभवला महिला रिक्षाचालकांचा जिद्दीचा प्रवास!

'बंडखोर'च्या टीमने अनुभवला महिला रिक्षाचालकांचा जिद्दीचा प्रवास!

Letsupp 2 days ago

The Inspiring Journey of Women Auto-Rickshaw Drivers! : कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच हातात रिक्षाचं स्टेअरिंग घेऊन स्वावलंबनाचा मार्ग निवडणाऱ्या महिला रिक्षाचालकांचा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

परिस्थितीसमोर हार न मानता स्वतःच्या कष्टावर उभ्या राहिलेल्या अशाच महिला रिक्षाचालकांच्या जिद्दीला सलाम करण्यासाठी आगामी मराठी चित्रपट 'बंडखोर'च्या टीमने ठाण्यात त्यांची खास भेट घेतली. या भेटीत केवळ संवादच नाही, तर त्यांच्या रोजच्या आयुष्यातील संघर्ष, अनुभव आणि स्वावलंबनाचा प्रवास जवळून जाणून घेण्याचा प्रयत्न कलाकारांनी केला. या खास भेटीत अभिनेत्री छाया कदम, तितीक्षा तावडे, पूजा कातुर्डे आणि दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर सहभागी झाले होते. कलाकारांनी महिला रिक्षाचालकांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या आयुष्याचा प्रवास जाणून घेतला.

घरातील जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी, समाजाचा दृष्टिकोन आणि पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात स्वतःची जागा निर्माण करताना आलेल्या अडचणींबाबत महिलांनी आपले अनुभव कलाकारांसोबत शेअर केले. रोज रस्त्यावर उतरून प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवताना येणारी आव्हाने, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून कामासाठी द्यावा लागणारा वेळ आणि या व्यवसायातून मिळालेल्या आर्थिक स्वावलंबनाबद्दलही महिलांनी सांगितले. त्यांच्या संघर्षाच्या कहाण्या ऐकताना 'बंडखोर'च्या टीममधील कलाकारही भावुक झाले. या भेटीची आणखी एक खास बाब म्हणजे कलाकारांनी स्वतः रिक्षा चालवण्याचा अनुभव घेतला.

मोर्चात माणसं घुसवून मला गोळ्या घालायचा डाव; मनोज जरांगेंचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप

महिला रिक्षाचालकांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांनी रिक्षाचं स्टेअरिंग हाती घेतलं आणि त्यांच्या दैनंदिन कामाचा अनुभव जाणून घेतला. पडद्यावर विविध भूमिका साकारणाऱ्या कलाकारांसाठी प्रत्यक्ष आयुष्यातील या 'बंडखोर' महिलांचा प्रवास जवळून अनुभवण्याची ही वेगळी संधी ठरली. कलाकारांना प्रत्यक्ष भेटल्याने महिला रिक्षाचालकांचाही आनंद द्विगुणित झाला. काही महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. केवळ औपचारिक भेट न ठेवता कलाकारांनी त्यांच्यासोबत वेळ घालवला, गप्पा मारल्या आणि एकत्र जेवणाचाही आनंद घेतला.

त्यानंतर 'बंडखोर' चित्रपटातील गाण्यावर कलाकार आणि महिला रिक्षाचालकांनी एकत्र नृत्य केले. त्यामुळे संघर्षाच्या आठवणींनी भावुक झालेल्या या भेटीचा शेवट आनंदी वातावरणात झाला. स्वतःच्या अस्तित्वासाठी, कुटुंबाच्या भविष्यासाठी आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी पारंपरिक चौकट मोडून वेगळा मार्ग निवडणाऱ्या या महिला रिक्षाचालकांच्या आयुष्याची 'बंडखोर' चित्रपटाच्या कथेशीही एक वेगळी नाळ जोडली गेली आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तिच्यासमोर न झुकता स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेणे हीच खरी 'बंडखोर' वृत्ती असल्याचा संदेश या भेटीतून अधोरेखित झाला.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभासह 9.25 एकर जमिनीचा वाद; जमादार-माळवदकर कुटुंबाच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

'बंडखोर' हा चित्रपटही सहा स्त्रियांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या संघर्षांभोवती फिरतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर परिस्थिती, नाती आणि सामाजिक चौकटींना सामोरे जाताना या महिला स्वतःसाठी कोणते निर्णय घेतात आणि त्या निर्णयांसाठी कशा उभ्या राहतात, याची कथा चित्रपटातून उलगडणार आहे. त्यामुळे पडद्यावरील या सहा स्त्रियांच्या संघर्षाला प्रत्यक्ष आयुष्यात स्वतःच्या हिमतीवर वाटचाल करणाऱ्या महिला रिक्षाचालकांच्या कहाण्यांची जोड मिळाल्याने ही भेट विशेष ठरली.

संजय शेटये आणि विनसन ग्राफिक प्रोडक्शन निर्मित तसेच सत्यसाई फिल्म्स प्रस्तुत 'बंडखोर' चित्रपटाचे संवाद सिद्धार्थ साळवी आणि इरावती कर्णिक यांनी लिहिले आहेत. चित्रपटात छाया कदम, मृणाल कुलकर्णी, प्रियदर्शनी इंदलकर, तितीक्षा तावडे, पूजा कातुर्डे, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, महेश वामन मांजरेकर, मंगेश देसाई, सिद्धार्थ बोडके, माधव देवचके आणि संकेत पाठक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

महिलांच्या संघर्षाची, स्वाभिमानाची आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याच्या धाडसाची गोष्ट सांगणारा 'बंडखोर' येत्या 24 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी ठाण्यातील महिला रिक्षाचालकांसोबत झालेली ही भेट 'बंडखोर'च्या टीमसाठीही प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp