Dailyhunt
बीड जिल्ह्यात संतापजनक घटना! अल्पवयीन मुलीवर घराशेजारी राहणाऱ्या वृद्धाचा अत्याचार

बीड जिल्ह्यात संतापजनक घटना! अल्पवयीन मुलीवर घराशेजारी राहणाऱ्या वृद्धाचा अत्याचार

Letsupp 2 months ago

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील दिंद्रुड पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी आणि सभ्य समाजाला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचं आमिष दाखवून एका 70 वर्षीय वृद्धाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण बीडजिल्हा संतापाने पेटून उठला असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

पीडित मुलगी ही इयत्ता चौथीत शिकते. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ती शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती. वाटेत ती तिच्या एका मैत्रिणीची वाट पाहत थांबली असताना, गावातीलच बाबुराव केरबा निरडे (वय 70 वर्ष) या नराधमाने तिला गाठलं. त्याने मुलीला चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून स्वतःच्या घरात बोलावून घेतलं. मुलगी घरात येताच आरोपीने दारे लावून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या क्रूर कृत्यानंतर आरोपीने तिला कोणालाही न सांगण्याची धमकी देऊन बाहेर सोडलं अशी माहिती समोर आली आहे.

धक्कादायक! बीडमध्ये ग्रामसेवकाचं अपहरण; पत्नीनेच रचला कट, नक्की काय घडलं?

अत्याचारानंतर पीडित मुलगी तशाच अवस्थेत शाळेत गेली, मात्र तिची मानसिक स्थिती खालावली होती. शाळेतून घरी परतल्यानंतर ती अत्यंत शांत आणि धास्तावलेली होती. तिच्या वागण्यातील हा बदल आईच्या लक्षात आला. आईने मायेने विचारणा केली असता, बालिकेला रडू कोसळले आणि तिने घडलेला सर्व संतापजनक प्रकार आईला सांगितला. आपल्या पोटच्या गोळ्यासोबत झालेला हा अन्याय ऐकून पालकांना मोठा धक्का बसला.

ही घटना बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी शाळेच्या वेळेत घडली. आरोपी हा त्याच गावातील रहिवासी असून पीडित कुटुंबाचा परिचयाचा होता. पीडितेच्या आईने उशीर न करता तात्काळ दिंद्रुड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने आरोपीवर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी पसार झाला होता, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला अंबाजोगाई येथून बेड्या ठोकल्या. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचं वातावरण आहे. अशा नराधमाला समाजात स्थान असू नये, त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp