Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ब्रेकिंग :  माजी राज्यपाल पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूरमध्ये निधन; वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ब्रेकिंग : माजी राज्यपाल पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूरमध्ये निधन; वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Letsupp 1 week ago

Padmashri D.Y Patil Passes Away At Kolhapur : माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूरमध्ये वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे. डी. पाटील यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1935 रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आंबप या छोट्याशा गावात झाला.

साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांना महाराष्ट्रात शिक्षणमहर्षी या उपाधीने ओळखले जात होते. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी मोठे साम्राज्य उभारले होते. डी.वाय. पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. मात्र, काही काळानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून बाजूला होत आपले पूर्ण लक्ष शिक्षण क्षेत्रावर केंद्रित केले होते. समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे त्यांना १९९१ साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिक्षण क्षेत्रातील कार्य

डॉ. डी. वाय. पाटील यांचा विश्वास होता की, उच्च दर्जाचे शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. या ध्येयातून त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालये, दंतवैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, व्यवस्थापन संस्था, कृषी, जैवतंत्रज्ञान आणि नर्सिंग शिक्षण आणि विद्यापीठे आणि संशोधन संस्थांचा समावेश आहे. आज महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत त्यांच्या नावाने चालणाऱ्या संस्थांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणाबरोबरच त्यांनी आधुनिक रुग्णालये उभारून आरोग्यसेवेलाही मोठे योगदान दिले. अनेक सुपरस्पेशालिटी रुग्णालयांमुळे सामान्य नागरिकांना प्रगत वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्या.

राजकीय कारकीर्द आणि राज्यपालपद

त्यांची राजकीय कारकीर्द प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधून सुरू झाली. 1957 ते 1962 या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर 1967 आणि 1972 मध्ये ते पन्हाळा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांची भारताच्या विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी 2009 ते 2013 मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणून तर, 2013 ते 2014 मध्ये बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला.

क्रीडा क्षेत्रालाही दिले नवे व्यासपीठ

याशिवाय त्यांनी क्रीडा क्षेत्रालाही त्यांनी मोठे प्रोत्साहन दिले. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम हे भारतातील अत्याधुनिक क्रिकेट आणि बहुउद्देशीय स्टेडियमपैकी एक मानले जाते. या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने तसेच इंडियन प्रीमियर लीग (IPL)चे सामनेही खेळवले गेले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp