Dailyhunt
मराठी रंगभूमीवर हास्याची नवी लाट; 'लाडकी विहीण योजना' घेऊन निर्मिती माहेरी परतल्या

मराठी रंगभूमीवर हास्याची नवी लाट; 'लाडकी विहीण योजना' घेऊन निर्मिती माहेरी परतल्या

Letsupp 1 month ago

Nirmiti Sawant : शासनाच्या योजना जनतेसाठी असतात, मात्र ही योजना थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत मराठी रसिकांसाठी घेऊन येत आहेत 'लाडकी विहीण योजना'.

हसवण्याची, मन हलकं करण्याची आणि रोजच्या ताणतणावापासून क्षणभर विरंगुळा देणारी खास मनोरंजन योजना. योजनेचा उद्देश एकच भरपूर हशा आणि खळखळून हास्यविनोद. अष्टविनायक आणि पंचशील एण्टरटेन्मेंट (Panchsheel Entertainment) निर्मित 'लाडकी विहीण योजना' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या नाटाकाचे लेखन प्रथमेश शिवलकर यांनी केले असून दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे.

नावात 'योजना' असली तरी यात कुठलीही कागदपत्रं, अटी-शर्ती नाहीत; आहे फक्त खुसखुशीत विनोद, मिश्किल संवाद आणि मराठी माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील गंमती-जमतींचं जिवंत चित्रण. कौटुंबिक वास्तवावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करत ही योजना प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करणार आहे. 'ही कोणतीही शासकीय योजना नाही; ही पूर्णपणे रसिकांसाठीची मनोरंजन योजना आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकारांनी हे स्पष्ट केलं.

अष्टविनायक संस्थेचे निर्माते दिलीप जाधव यांच्यासोबत नाटक करताना अनेकवेळा त्यांच्याकडे दिग्दर्शन आणि निर्मितीची इच्छा व्यक्त केली होती. योग्यवेळी तुला संधी देईन असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. आज या नाटकाच्या निमित्ताने मला ही संधी दिली त्यासाठी अष्टविनायक संस्थेचे आणि दिलीप दादांचे मनापासून आभार मानतो असं सांगत, अभिनेता प्रसाद ओक यांनी 'लाडकी विहीण योजना' हे नाटक रसिकांना दिलखुलास आनंद देईल असा विश्वास व्यक्त केला. निर्माता म्हणून हा आनंदाचा आणि समाधानाचा क्षण आहे. अष्टविनायक संस्था हे नावं आलं की, उत्तम आणि सकस हे अधोरेखित होतं. या नाटकाच्या निमित्ताने पंचशील एण्टरटेन्मेंट अष्टविनायक संस्थेशी जोडली जातेय याचा आनंद अभिनेता स्वप्नील जोशी ने व्यक्त केला.

मी नेहमी वेगवेगळ्या गोष्टी शोधात असतो. नाटक चालू शकेल यापेक्षा ते वर्क होईल अशी आत्मविश्वास देणारी संहिता जेव्हा माझ्याकडे येते. तेव्हा मी त्यासाठी आवर्जून पुढाकार घेतो. या नाटकाची संहिता मला दमदार वाटली. मी खात्रीने सांगू शकतो की, १५० हून अधिक प्रयोगाची मजल हे नाटक मारेल असा विश्वास निर्माते दिलीप जाधव यांनी व्यक्त केला. पाहिलं सगळं नेहमीच खास असतं. एवढ्या सगळ्या मात्त्तबर मंडळींसोबत माझं पाहिलं व्यावसायिक नाटक येतयं याहून स्पेशल काही असू शकतं नाही अशी भावना लेखक प्रथमेश शिवलकर यांनी बोलून दाखविली.

योजना म्हंटल्या की शासनाच्या एवढंच आपल्याला माहित आहे. शासनाची नाही मी सावंतांची योजना, हसवायला येतेय मराठी रसिकजना! असं मी गमतीने म्हणतो असं सांगत, दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी या नाटकामागे उभ्या असलेल्या भक्कम सपोर्ट सिस्टीमचं कौतुक याप्रसंगी केलं.

'प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं, तर तोच माझा खरा लाभ' असं सांगताना, निर्मिती सावंत यांनी माहेरी परतल्याचा आनंद बोलून दाखविला. नाटक म्हणजे माझं माहेर. मधल्या काळात चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना नाटक करायला मिळत नव्हतं आता या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर परत काम करायला मिळतंय याचा आनंद आहे. आजवर मी फक्त अष्टविनायक संस्थेसोबत काम केलं आहे . आमचे हे ऋणानुबंध खूप वर्षांपासून असून आम्ही हा बंध जपला आहे. या नाटकाच्या निमित्ताने प्रसाद आणि स्वप्नील सारखी हुशार कलाकार मंडळी जोडली गेली आहेत. कलाकार आणि तंत्रज्ञ यांची उत्तम भट्टी आणि मॅडनेस यामुळे 'लाडकी विहीण योजना' रसिकांना नक्कीच खुश करेल, असं अभिनेत्री निर्मिती सावंत म्हणाल्या.

हसत-खेळत मनोरंजनाचा अनुभव देण्याचं आश्वासन देणाऱ्या या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग गुरु ५ मार्च दु. ४.०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली, शुक्र ६ मार्च दु. ४. ०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले शनि ७ मार्च दु. ४. ०० वा. यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा रवि ८ मार्च दु. १. ०० वा. यशवंतराव चव्हाण, कोथरूड येथे होणार आहेत.

भारताला सेमिकंडक्टर स्वातंत्र्याची गरज; एमआयटी एडीटी विद्यापीठात 'सेमिकंडक्टर तंत्रज्ञानावर' राष्ट्रीय परिसंवाद

निर्मिती सावंत यांच्या सोबत स्नेहा रायकर, पुर्णिमा अहिरे-केंडे, अधोक्षज कऱ्हाडे, सुनील जाधव, मुकेश जाधव आदी कलाकार मंडळी यात आहेत. 'लाडकी विहीण योजना' नाटकाचे निर्माते दिलीप जाधव, प्रसाद ओक असून सहनिर्माते स्वप्नील जोशी, मंजिरी ओक, तृप्ती पाटील, संजय मेमाणे आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाश योजना सुनील जाधव यांनी केली असून गीतं क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत. गायिका राधिका भिडे यांचा स्वरसाज आहे. वेशभूषा पुर्णिमा ओक तर रंगभूषा मदन गायकवाड यांची आहे.सूत्रधार प्रणित बोडके आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp