Dailyhunt
मुंबई ते दिल्ली संयुक्त कारवाई; जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दोन जण अटकेत, टॉय कारमधून बॉम्बस्फोटाचा कट उधळून लावला

मुंबई ते दिल्ली संयुक्त कारवाई; जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दोन जण अटकेत, टॉय कारमधून बॉम्बस्फोटाचा कट उधळून लावला

Letsupp 1 week ago

Bomb blast plot foiled : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांच्या सावटाखाली आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.

मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीस स्पेशल सेल यांच्या संयुक्त कारवाईत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे मोसाब अहमद उर्फ कलाम आणि मोहम्मद हमद कालरा अशी असून, हे दोघेही दिल्लीत खेळण्यातील कारचा वापर करून आयईडी स्फोट घडवण्याच्या तयारीत होते. हा कट उधळून लावत पोलिसांनी संभाव्य मोठी जीवितहानी टाळली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईतील कुर्ला आणि कडवली परिसरात धाडसी कारवाई करत या दोघांना ताब्यात घेतले. अटकेनंतर त्यांना पुढील चौकशीकसाठी तातडीने दिल्लीला हलवण्यात आले आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर न्ययालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे, जेणेकरून या कटामागील सूत्रधार आणि इतर साथीदारांचा शोध घेता येईल.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या दोघांचे ऑनलाईन माध्यमांतून कट्टरपंथी विचारसरणीने ब्रेनवॉशिंग करण्यात आले होते. ते सीमापार बसलेल्या जैशच्या म्होरक्यांच्या निर्देशानुसार भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी सक्रिय झाले होते. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून काही महत्वाचे कागदपत्रे आणि संशयास्पद साहित्य जप्त केले असून, त्यावरून मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी दिल्लीत घडलेल्या भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अधिकच महत्वाची ठरते. 10 नोव्हेंबर 2025 रोजी लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात अमोनियम नायट्रेटचा वापर करून स्फोट घडवण्यात आला होता. या घटनेत 15 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 20 हुन अधिक जण जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर, यावेळी संभाव्य हल्ला रोखण्यात पोलिसांना मिळालेले यश अत्यंत महत्वाचे मानले जात असून, दिल्लीकरांनी मोठा सुटकेचा निश्वास टाकला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp