Dailyhunt
नाशिकमध्ये मोठी कारवाई; भोंदूबाबा अशोक खरातच्या घरावर आयकरची धाड, सिन्नरमध्ये ईडीची एंट्री, तपासात नवे धागेदोरे

नाशिकमध्ये मोठी कारवाई; भोंदूबाबा अशोक खरातच्या घरावर आयकरची धाड, सिन्नरमध्ये ईडीची एंट्री, तपासात नवे धागेदोरे

Letsupp 3 days ago

Income Tax raid on Ashok Kharat’s house : भोंदूबाबा अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर सुरू असलेल्या चौकशीमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. महिलांचे शोषण, अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार यांसारख्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालले आहे.

दरम्यान, तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

नाशिकमध्ये या प्रकरणाच्या तपासाला आता अधिक वेग आला असून विशेष तपास पथक आणि नाशिक पोलीस यांच्याकडून संयुक्त कारवाई सुरू आहे. आतापर्यंत अशोक खरातविरोधात तब्बल 14 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फसवणूक, महिलांचा छळ, धमकी आणि आर्थिक गैरव्यवहार यांसारख्या विविध कलमांखाली त्याच्यावर गुन्हे नोंदवले गेले आहेत.

आज अशोक खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढील चौकशीसाठी पोलिसांना अधिक वेळ मिळणार असून, या कालावधीत आणखी काही महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराच्या शक्यतेचा तपास करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय अर्थातच ईडी देखील सक्रिय झाली आहे. भोंदू अशोक खरातच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. नाशिकमधील त्याच्या निवासस्थानी आयकर विभागाने धाड टाकली असून, सिन्नर तालुक्यातील ईशान्येश्वर मंदिर परिसरात देखील ईडीचे पथक दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

या छापेमारीदरम्यान मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदी आणि इतर महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात अनेक पीडियांनी पुढे नेऊन तक्रारी दाखल करण्यास सुरूवात केली आहे, त्यामुळे गुन्ह्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांकडून बहुआयामी तपास सुरू असून, या प्रकरणामागील संपूर्ण जाळे उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशोक खरातच्या माध्यमातून चालवले जाणारे कथित अंधश्रद्धेचे साम्राज्य, त्यामागील आर्थिक व्यवहार आणि त्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यावर यंत्रणांचा भर आहे. आता या तपासातून पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येणार, आणि या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग उघड होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp