Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सीएनजी वाहनधारकांनाही महागाईचा झटका! पुणे-नाशिकमध्ये दरवाढ, पेट्रोल-डिझेलनंतर आता गॅसही महाग

सीएनजी वाहनधारकांनाही महागाईचा झटका! पुणे-नाशिकमध्ये दरवाढ, पेट्रोल-डिझेलनंतर आता गॅसही महाग

Letsupp 2 months ago

After petrol and diesel, now gas is also expensive : राज्यातील सर्वसामान्य वाहनधारकांना महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. गेल्या 15 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने हैराण झालेल्या नागरिकांना आता सीएनजीच्या दरवाढीलाही सामोरे जावे लागत आहे.

पुणे आणि नाशिकमध्ये गुरुवारपासून सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली असून त्यामुळे वाहनचालकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.

पुण्यात सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात आता सीएनजीचा दर 94 रुपये 85 पैसे प्रतिकिलो झाला आहे. तर नाशिकमध्येही सीएनजीच्या दरात 1 रुपया 35 पैशांची वाढ झाली असून प्रतिकिलो दर 96 रुपये 50 पैशांवर पोहोचला आहे. यापूर्वी हा दर 95 रुपये 15 पैसे होता.

सीएनजी हा पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त आणि किफायतशीर पर्याय मानला जात असल्याने गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सीएनजी वाहनांकडे मोर्चा वळवला होता. मात्र आता सीएनजीही महागाईच्या विळख्यात सापडल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात सीएनजी दरवाढीचा हा दुसरा झटका आहे. यापूर्वी 9 मे रोजी प्रतिकिलो 1 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली होती.

अहमदाबादमध्ये आढळला इबोलाचा संशयित रुग्ण; मुंबई, दमण, सिल्व्हासा प्रवासाने वाढवली धास्ती

सीएनजी क्षेत्रासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या इनपूट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्येही सीएनजी दर वाढवण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्रातही दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती आणि ती आता खरी ठरली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावाचाही इंधन दरांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर वाढले आहेत. त्याचा थेट परिणाम देशातील इंधन दरांवर होत असून गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल चार वेळा वाढ करण्यात आली आहे.

सोमवारी देशभरात पेट्रोलच्या दरात 2 रुपये 61 पैशांची, तर डिझेलच्या दरात 2 रुपये 17 पैशांची वाढ झाली. 15 मेपासून सुरू झालेल्या या दरवाढीच्या मालिकेमुळे गेल्या दहा दिवसांत पेट्रोल 7 रुपये 38 पैशांनी, तर डिझेल 7 रुपये 09 पैशांनी महागले आहे.

इंधन दरवाढीबरोबरच राज्यातील काही भागांमध्ये इंधनटंचाईची समस्याही गंभीर बनू लागली आहे. बुलढाणा, वाशिम आणि परभणी जिल्ह्यांमध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकऱ्यांना रात्रभर पेट्रोल पंपांवर रांगा लावाव्या लागत आहेत. शेतीच्या हंगामातच इंधनटंचाई आणि दरवाढीचा दुहेरी फटका बसत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp