Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सुप्रिया सुळेंच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिला 'व्हॉइस रेस्ट'चा सल्ला

सुप्रिया सुळेंच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिला 'व्हॉइस रेस्ट'चा सल्ला

Letsupp 6 days ago

Dr. Advised Supriya Sule Complete Voice Rest : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. घशाला सूज आल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील एक ते दोन आठवडे पूर्णपणे 'व्हॉइस रेस्ट' घेण्याचा सल्ला दिला आहे.

त्यामुळे त्या या कालावधीत भाषणे, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणे टाळणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली.

विशेष म्हणजे, शुक्रवारी सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्लीत जाऊन सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तसेच संसदेच्या आगामी अधिवेशनात हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर अचानक घशाच्या त्रासामुळे त्यांना विश्रांती घ्यावी लागत आहे.

डॉक्टरांनी काय सांगितले?

सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'माझ्या घशाच्या आणि आवाजाच्या समस्येबाबत मी नुकतीच डॉ. मिलिंद कीर्तने यांची भेट घेतली. तपासणीनंतर त्यांनी घशात सूज असल्याचे निदान केले असून, मला पूर्णपणे 'व्हॉइस रेस्ट' घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच 'व्हॉइस थेरपी' सुरू करण्यास सांगितले असून, पुढील एक ते दोन आठवडे भाषणे, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. माझी ही परिस्थिती समजून घेतल्याबद्दल सर्वांचे आभार.'

संसदेच्या अधिवेशनापूर्वी पक्षासमोर आव्हान

येत्या 20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अशा वेळी विरोधी पक्षाकडून विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेण्याची तयारी सुरू असतानाच सुप्रिया सुळे यांना आवाजाला विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे लोकसभेत पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी काही काळ इतर खासदारांवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुप्रिया सुळे या संसदेत विविध राष्ट्रीय आणि राज्यातील प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडत असतात. त्यामुळे त्यांना काही दिवस भाषणे टाळावी लागणार असल्याने त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp