Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी शांत; पत्रकांना आवाहन करताना धनंजय मुंडे काय म्हणाले?

तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी शांत; पत्रकांना आवाहन करताना धनंजय मुंडे काय म्हणाले?

Letsupp 1 week ago

बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर (Beed) समाजमाध्यमांवर आणि काही माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या वृत्तांवर मंत्री धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त करत जबाबदार माध्यमे आणि माध्यमकर्मींना शहानिशा करूनच बातम्या प्रसारित करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.

मुंडे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील दोन दिवसांपासून काही माध्यमांमध्ये बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांचा विरोधी पक्षातील एका लोकप्रतिनिधीसोबत वाद किंवा खडाजंगी झाल्याच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या. मात्र अशा प्रकारचा कोणताही वाद झाला नसून बैठक अत्यंत खेळीमेळीत पार पडल्याचा त्यांनी दावा केला आहे.

राजकारणात वैचारिक मतभेद असले तरी संवाद आणि सौहार्द कायम असते, असंही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीला उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींना विचारपूस केली असती तर सत्य समोर आले असते. मात्र काही जण जाणूनबुजून अशा बातम्या चालवून जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.

बीड-पुणे रेल्वे लवकरच सुरू होणार; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची मोठी घोषणा

याशिवाय, बीड शहरात झालेल्या एका कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांच्यासमोर शेतकऱ्यांना दम दिल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतर प्रथमच सुनेत्रा पवार बीडमध्ये आल्या होत्या. कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी असल्याने नागरिकांनी आपले प्रश्न शांतपणे आणि हळू आवाजात मांडावेत, एवढीच विनंती आपण केली होती. मात्र त्याचे चुकीचे अर्थ लावून 'शेतकऱ्यांना दम दिला' अशा स्वरूपाच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

मुंडे यांनी पुढे सांगितले की, बीड जिल्ह्यातील ९० टक्क्यांहून अधिक पत्रकार अत्यंत जबाबदारीने आणि निष्पक्षपणे काम करतात. त्यांच्या पत्रकारितेचा आपण नेहमीच आदर करत आलो आहोत. मात्र काही पत्रकारांविरोधात आर्थिक गैरव्यवहारासंदर्भातील तक्रारी पूर्वीपासून आपल्याकडे आल्या असूनही, कोणाचे नुकसान होऊ नये या भूमिकेतून आपण वरिष्ठांकडे तक्रार केली नाही असंही ते म्हणाले.

शेवटी, जिल्ह्यातील सामाजिक वातावरण हळूहळू पूर्वपदावर येत असताना चुकीच्या आणि अप्रमाणित बातम्या पसरवून ते पुन्हा बिघडवू नये, अशी कळकळीची विनंती धनंजय मुंडे यांनी माध्यमे आणि माध्यमकर्मींना केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp