Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Video : जरांगेंचा लढा गरीब मराठ्यांसाठी नाही, राजकीय मराठ्यांसाठी; ऐका सदावर्तेंची खरमरीत मुलाखत

Video : जरांगेंचा लढा गरीब मराठ्यांसाठी नाही, राजकीय मराठ्यांसाठी; ऐका सदावर्तेंची खरमरीत मुलाखत

Letsupp 2 weeks ago

वास्तववादी चळवळीतून आलेलो आम्ही माणसं आहोत. (Jarange) बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारे आहोत. त्यामुळं पुढाऱ्यांना किंवा कुणालाही वाघ म्हणणं, 'ऑपरेशन टायगर' असं संबोधणं आणि माणसाला प्राण्याप्रमाणे लेखणं हे संविधानिक पातळीवर योग्य नाही, असं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आरक्षण, राजकारण आणि इतर अनेक विषयांवर थेट भाष्य केलं आहे.

ते 'लेट्सअप'शी बोलत होते.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला तुम्ही विरोध का करता, असा प्रश्न विचारला असता सदावर्ते म्हणाले की, या देशात दोन मोठ्या लढाया झाल्या. एक लढाई स्वातंत्र्याची होती, तर दुसरी समानतेची होती. समानतेच्या लढाईतून आरक्षणाचा जन्म झाला असून आरक्षणाचा थेट संबंध मानवाधिकाराशी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या दोन्ही लढाया लढल्या. मात्र, दुसऱ्या लढाईतून देण्यात आलेलं आरक्षण ही गरीबी हटाव मोहीम नाही किंवा कुणाला हटवण्याची मोहीमही नाही. सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागासलेल्या घटकांसाठी आरक्षणाची संविधानिक तरतूद करण्यात आली आहे, असे सदावर्ते यांनी स्पष्ट केलं.

जरांगे फक्त प्यादा, मराठा आंदोलनामागे एकनाथ शिंदे; गुणरत्न सदावर्तेंचा मोठा दावा

पूर्वी आपल्या मागण्यांसाठी निघणाऱ्या मोर्चांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार केला जात होता. मात्र, आता जरांगे यांच्या आंदोलनात काय नारा आणि काय घोषणा दिल्या जात आहेत, असा सवाल सदावर्ते यांनी उपस्थित केला. सध्या ज्या कुणबी आरक्षणाची मागणी केली जात आहे, ती केवळ मराठा-कुणबीपुरती मर्यादित नाही. 58 लाख नोंदींच्या दाव्यात ब्राह्मणांसह इतर समाजातील लोकांच्याही नोंदी असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, डिफेंडर गाडीचा उल्लेख करत सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांना लक्ष्य केले. या आंदोलनामागे सर्व काही सुनियोजित पद्धतीने केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

क्रेनच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करणं, अशा प्रकारच्या गोष्टी करणारे सर्वच मराठा बांधव नाहीत, तर यामागं वाळू काढणाऱ्या टोळ्यांचा सहभाग असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला. याबाबत औरंगाबाद खंडपीठानेही अनेकदा टिप्पणी केली असल्याचे ते म्हणाले. मराठवाड्यात न्यायमूर्ती बी. एच. मार्लापल्ले यांनी काही दिवसांपूर्वी मराठा आणि कुणबी हे एकच नसल्याचे सांगितलं होतं, असा दावाही त्यांनी केला. 58 लाख नोंदींचा आकडा केवळ मराठवाड्यापुरता नसून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नोंदीही त्यात मोजण्यात आल्याचं सदावर्ते यांनी सांगितलं. मात्र, मराठवाड्यातील आकडेवारीही जुळत नसल्याचं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, जरांगे पाटील यांचा हा लढा गरीब मराठ्यांसाठी नसून राजकीय मराठ्यांसाठी असल्याचा थेट आरोप सदावर्ते यांनी केला. 10 टक्के एसईबीसी आरक्षणामध्ये केवळ शिक्षण आणि नोकरीत तरतूद होती. त्या आरक्षणाला जरांगे यांनी ना समर्थन दिले, ना विरोध केला. आता ओबीसी आरक्षणामध्ये जाण्याची मागणी केली जात आहे. घटनादुरुस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद झाली आणि त्यामुळे ग्रामीण भागात मोठा सामाजिक बदल झाला. पूर्वी ज्या जातींना सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, सभापती किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष यांसारखी पदे मिळत नव्हती, त्या समाजातील लोकांनाही आता ही पदे मिळू लागली आहेत, असे सदावर्ते म्हणाले.

या बदलानंतर कायमस्वरूपी मराठा कुटुंबांमध्ये राहणारी राजकीय पदे आता इतर जातींच्या घरात जाऊ लागली आहेत. काही पदे तर किमान 20-20 वर्षे दुसऱ्या समाजाकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि हे काहींना सहन होत नाही, असा दावा सदावर्ते यांनी केला. याच मुद्द्यावरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. मराठा मुख्यमंत्री नसतो तेव्हाच जातीय पातळीवर मोर्चे किंवा आंदोलने केली जातात, असा आरोप त्यांनी केला. पूर्वी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना किंवा विरोध करताना खालच्या पातळीची भाषा वापरली जात नव्हती, मात्र आता जरांगे यांच्या आंदोलनात अशी भाषा वापरली जात असल्याचे म्हणत त्यांनी जरांगे यांच्या भूमिकेवरही टीका केली. मात्र, जरांगे पाटील हे आपले शत्रू नसल्याचेही सदावर्ते यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp