Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सव सोहळ्यात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी ; शरद पवारांकडून खडसेंच्या भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सव सोहळ्यात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी ; शरद पवारांकडून खडसेंच्या भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

Live Trends News 5 days ago

मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५ व्या वर्षात पदार्पणानिमित्त मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे आयोजित अमृत महोत्सव सोहळा राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय दिग्गजांच्या उपस्थितीत अत्यंत दिमाखदार आणि उत्साही वातावरणात पार पडला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील मातब्बर नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आगमन झालेल्या प्रमुख पाहुण्यांचे दिंडी सोहळ्याद्वारे व्यासपीठाकडे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी, खडसे परिवार आणि लोकनेते एकनाथराव खडसे अमृत महोत्सव समितीतर्फे सर्व मान्यवरांचे संत मुक्ताईची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, शेकाप अध्यक्ष जयंत पाटील, रासप अध्यक्ष महादेव जानकर, शशिकांत शिंदे, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, गुलाबराव देवकर, खासदार भास्कर भगरे, आमदार अभिजित पाटील, आमदार किशोर दराडे, अशोक जैन, रोहिणीताई खडसे, मंदाताई खडसे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व खडसे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पाया भक्कम करण्यासाठी आणि सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी खडसेंनी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करत, राजकीय वैमनस्य न ठेवता लोकशाहीत सर्वांनी एकत्र काम करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमादरम्यान डॉ. दिलीप तिवारी आणि प्रमोद बऱ्हाटे लिखित 'नाथ पर्व' या खडसे यांच्या चरित्र ग्रंथाचे आणि विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले, तसेच भोरगाव लेवा पंचायतीतर्फे त्यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला. पंकजा मुंडे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन जयप्रकाश बाविस्कर यांनी केले.

सत्काराला उत्तर देताना आमदार एकनाथराव खडसे भावुक झाले. संत मुक्ताईला वंदन करून त्यांनी १९७८ च्या पहिल्या निवडणुकीतील अवघ्या एका मताच्या पराभवापासून ते राजकीय चढ-उतारांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि भाऊसाहेब फुंडकर यांच्यासोबत घालवलेल्या दिवसांचे स्मरण करताना त्यांनी सध्याच्या राजकीय संस्कृतीतील बदलांवर खंत व्यक्त केली. आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगी शरद पवार यांनी दिलेल्या राजकीय आसऱ्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानताना, खडसे यांनी पुत्राच्या निधनाचा उल्लेख करत जनतेने दिलेल्या प्रेमामुळेच आपण पुन्हा उभे राहू शकलो, अशा भावना व्यक्त केल्या.

अध्यक्षीय भाषणात शरदचंद्र पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या महाराष्ट्रातील राजकीय योगदानाचा गौरव केला. महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्या नेत्यांची यादी प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, असे सांगत पवार यांनी खडसेंच्या अभ्यासपूर्ण आणि आक्रमक वक्तृत्वाचे कौतुक केले. केवळ निवडणुका न लढवता ग्रामीण भागात संघटना मजबूत करणाऱ्या खडसेंचे योगदान महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नेहमीच अधोरेखित राहील, असे प्रतिपादन त्यांनी केले. माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी आभार मानले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News