Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिनानिमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात परिसंवाद

आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिनानिमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात परिसंवाद

Live Trends News 6 days ago

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिनानिमित्त विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात महिलांचे आरोग्य हक्क, लैंगिक व प्रजनन आरोग्य तसेच गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचविण्याच्या गरजेवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्रसूती व स्त्रीरोग परिचर्या विभागातर्फे आयोजित या परिसंवादात विद्यार्थी, प्राध्यापक आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित विविध घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महिलांच्या आरोग्यविषयक समस्या, त्यांचे अधिकार आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेची भूमिका याबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या ज्युनिअर रेसिडेंट-२ डॉ. ऐश्वर्या चालवाडे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी सक्षम व संवेदनशील आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच महिलांना त्यांच्या आरोग्यविषयक हक्कांची माहिती असणे, त्यांचे संरक्षण करणे आणि आरोग्य सेवांपर्यंत सुलभ प्रवेश उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. चालवाडे यांनी आपल्या मार्गदर्शनात लैंगिक आणि प्रजनन आरोग्याशी संबंधित विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी सामाजिक, आर्थिक आणि जागतिक स्तरावरील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या आरोग्य समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता व्यक्त केली. आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी समाजात जनजागृतीची भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या परिसंवादाला महाविद्यालयातील प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी, इंटर्न तसेच पदवीपूर्व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. उपस्थितांनी विविध विषयांवर प्रश्नोत्तरांद्वारे संवाद साधत कार्यक्रम अधिक ज्ञानवर्धक बनविला. महिलांच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व उपस्थितांनी अधोरेखित केले.

महिलांचे आरोग्य, त्यांचे हक्क आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा याविषयी समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित हा परिसंवाद यशस्वीरीत्या पार पडला. आरोग्य क्षेत्रातील भावी व्यावसायिकांना महिलांच्या आरोग्य प्रश्नांविषयी अधिक संवेदनशील बनविण्यात या उपक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News