Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भडगावातील 'वाचक कट्टा' उपक्रमात 'उजेड पेरणारी माणसं' पुस्तकावर प्रेरणादायी चर्चा

भडगावातील 'वाचक कट्टा' उपक्रमात 'उजेड पेरणारी माणसं' पुस्तकावर प्रेरणादायी चर्चा

Live Trends News 1 week ago

डगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील जागृती मित्र मंडळ संचलित जागृती वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या 'वाचक कट्टा' या उपक्रमात शनिवारी साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

यावेळी भडगावचे ज्येष्ठ पत्रकार संजय पवार यांनी भुसावळ येथील लेखक आनंदा पाटील लिखित बहुचर्चित 'उजेड पेरणारी माणसं' हे पुस्तक जागृती वाचनालयाला भेट देत उपस्थितांसमोर पुस्तकातील विचार आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची ओळख करून दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय पवार यांनी या पुस्तकाला पेन प्रकाशन, पुणेचे देवा झिंजाड यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचे तसेच लेखक आनंदा पाटील यांच्या 'अंतरीचे बोल' या मनोगताचे सविस्तर विवेचन केले. लेखकाने आपल्या वडिलांना दिलेला पुस्तक लेखनाचा शब्द पूर्ण करण्यासाठी घेतलेले परिश्रम आणि त्याची तुलना रामायणातील प्रभू रामांनी पित्याचे वचन पाळण्यासाठी स्वीकारलेल्या वनवासाशी करत लेखकाला 'आधुनिक राम' असे संबोधल्याचा उल्लेख त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.

'उजेड पेरणारी माणसं' या पुस्तकात समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या तब्बल ८४ प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून देण्यात आला आहे. त्यापैकी काही निवडक व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेत संजय पवार यांनी त्यांच्या सामाजिक योगदानाची माहिती दिली. समाजात कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींच्या जीवनातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरातही समाजासाठी झटणारी अनेक माणसे असतात. त्यांच्या कार्याची दखल घेणे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे नमूद केले. प्रतिकूल परिस्थितीतही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा हा पुस्तकरूपी कृतज्ञ दस्तऐवज असल्याचे सांगत सर्वांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या वाचक कट्टा उपक्रमाला जागृती मित्र मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश भंडारी, सचिव प्रा. दीपक मराठे, प्रा. दिनेश तादळे, प्रा. भंगाळे, मुख्याध्यापक सुरेश रोकडे, डॉ. दुर्गेश रूले, सेवानिवृत्त प्राध्यापक पाटील, प्रा. अतुल देशमुख, नागेश वाघ, विजय देशपांडे, चव्हाण सर, प्रतिभा कुलकर्णी, कालिंदी सहस्रबुद्धे, देशमुख मॅडम, देशपांडे मॅडम यांच्यासह मोठ्या संख्येने महिला वाचक आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News