Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारताची डिजिटल झेप; जगातील पाचवी सर्वाधिक डिजिटलाईज्ड अर्थव्यवस्था, एआयमध्ये चौथे स्थान

भारताची डिजिटल झेप; जगातील पाचवी सर्वाधिक डिजिटलाईज्ड अर्थव्यवस्था, एआयमध्ये चौथे स्थान

Live Trends News 1 week ago

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेने जागतिक स्तरावर मोठी झेप घेतली असून भारत आता जगातील पाचवी सर्वाधिक डिजिटलाईज्ड अर्थव्यवस्था बनला आहे. Indian Council for Research on International Economic Relations (ICRIER) ने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या India's Digital Economy 2026 अहवालातून ही माहिती समोर आली.

विशेष म्हणजे 2025 मध्ये भारत आठव्या स्थानावर होता. अवघ्या एका वर्षात तीन स्थानांची प्रगती करत भारताने डिजिटल क्षेत्रात आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

अहवालानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या कामगिरीतही भारताने मोठी भरारी घेतली आहे. चिप्स-एआय इंडेक्समध्ये भारताने अमेरिका, चीन आणि सिंगापूरनंतर चौथे स्थान मिळवले आहे. देशातील डिजिटल कनेक्टिव्हिटी, वेगाने वाढणारे फिनटेक क्षेत्र आणि नवोपक्रमक्षमतेत झालेली सुधारणा यामुळे ही प्रगती शक्य झाल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

जगाच्या एकूण जीडीपीच्या तब्बल 96 टक्के भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 71 देशांमध्ये हा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये भारताने Germany, France, Japan आणि Canada यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांनाही मागे टाकल्याचे स्पष्ट झाले. भारतात डिजिटल माध्यमांतून सुमारे 31 लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला असून जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे एआय टॅलेंट हब म्हणूनही भारताची ओळख मजबूत होत आहे.

अहवालातील सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे जगातील 72 टक्के एआय वापरकर्ते आता विकसनशील देशांमध्ये आहेत. भारत आणि चीन मिळून जागतिक एआय वापराचा जवळपास 40 टक्के हिस्सा उचलत आहेत. त्यात एकट्या भारताचा जागतिक एआय वापरकर्त्यांमध्ये सुमारे 26 टक्के वाटा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भविष्यातील तंत्रज्ञानाच्या शर्यतीत भारत निर्णायक भूमिका बजावू शकतो, असे चित्र दिसत आहे.

मात्र या प्रगतीसोबत काही गंभीर आव्हानेही कायम आहेत. भारतात एआयचा वापर आणि प्रशिक्षित मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर असले तरी जागतिक खाजगी एआय गुंतवणुकीत भारताचा वाटा केवळ 1 टक्के आहे. अत्याधुनिक चिप्स, उच्च क्षमतेची संगणकीय पायाभूत सुविधा आणि मोठ्या एआय मॉेल्सचे नियंत्रण अद्याप काही मोजक्या देशांकडेच केंद्रित असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, भारताने डिजिटल स्केलचे रूपांतर जागतिक दर्जाच्या नवोपक्रमात करण्यासाठी संशोधनावर अधिक भर देणे, स्टार्टअप्स आणि विद्यापीठांमधील सहकार्य वाढवणे आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक अधिक वेगाने आकर्षित करणे आवश्यक आहे. डिजिटल भारताची वाढती ताकद आशादायी असली तरी पुढची मोठी झेप घेण्यासाठी संशोधन, भांडवल आणि तंत्रज्ञानातील स्वयंपूर्णता महत्त्वाची ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News