Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक घटना ;  ढाबा व्यवस्थापक तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक घटना ; ढाबा व्यवस्थापक तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Live Trends News 4 months ago

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातून गुरुवारी एक धक्कादायक घटना समोर आली असून फैजपूर रोडवरील एका ढाब्यावर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

भरत ज्ञानेश्वर वानखेडे (वय २७) असे मृत तरुणाचे नाव असून तो महेंद्र ढाबाचा व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. रात्रीच्या सुमारास ढाब्यावर एकटाच असताना त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर यावल शहरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरातील फैजपूर मार्गावरील महेंद्र ढाबा येथे भरत वानखेडे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. बुधवारी उशिरा रात्री तो ढाब्यावर एकटाच असताना त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही बाब लक्षात आल्यानंतर परिसरात एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी आणि परिचितांनी घटनास्थळी गर्दी केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात शोककळा पसरली.

या प्रकरणी महेंद्र रामा जावरे यांनी दिलेल्या माहितीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. भरत वानखेडे यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून कुटुंबीय आणि संबंधितांकडून माहिती घेतली जात आहे.

भरत वानखेडे हे यावल शहरातील हरिओम नगर परिसरातील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. विशेष म्हणजे भरत यांचा विवाह मागील वर्षीच झाला होता. घरातील जबाबदाऱ्या सांभाळत असताना अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहरातील मित्रपरिवार आणि परिचितांमध्येही या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

तरुण वयात अशा प्रकारे आयुष्य संपवण्याच्या घटनेमुळे यावल शहरात चर्चा सुरू झाली असून अनेकांनी भरत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पोलिस तपासातून या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News