Dailyhunt
जळगावात भाजपची आंबेडकर जयंती विशेष समिती स्थापन; आशिष सपकाळे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

जळगावात भाजपची आंबेडकर जयंती विशेष समिती स्थापन; आशिष सपकाळे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

Live Trends News 2 weeks ago

ळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीने एका विशेष जिल्हा समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून जिल्हाभर येत्या १३ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात 'प्रबोधन सप्ताह' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या सप्ताहाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार घराघरात पोहोचवण्याचा संकल्प पक्षाने केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या समितीच्या बैठकीत नामदार गिरीश महाजन, आमदार राजू मामा भोळे आणि जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या नवनियुक्त समितीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी आशिष उत्तमराव सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली असून उपाध्यक्षपदी मनोज सोनवणे यांची निवड झाली आहे. तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा शुभांगी बिराडे आणि ज्योती निंभोरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि त्यांनी देशासाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाचा प्रसार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हा या समितीचा मुख्य उद्देश आहे. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करण्यासाठी ही समिती आगामी काळात विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात 'प्रबोधन सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, शिष्यवृत्ती उपक्रम आणि बौद्ध समाजातील मान्यवरांचा सन्मान असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जातील.

विशेषतः विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे नियोजन करण्यात आले असून गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप देखील केले जाणार आहे. याशिवाय अनुसूचित जाती-जमाती वस्तीगृहांमध्ये १३ आणि १४ एप्रिल रोजी विशेष शिष्यवृत्ती व प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या सर्व उपक्रमांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होईल आणि हा प्रबोधन सप्ताह सामाजिकदृष्ट्या अत्यंत अर्थपूर्ण ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News