Dailyhunt
जळगावात उष्णतेचा तडाखा : भाजीपाल्याचे दर ५०% वाढले,  गृहिणींचे बजेट कोलमडले

जळगावात उष्णतेचा तडाखा : भाजीपाल्याचे दर ५०% वाढले, गृहिणींचे बजेट कोलमडले

Live Trends News 2 weeks ago

ळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा पारा ४३ अंशांच्या पार गेल्याने केवळ जनजीवनच विस्कळीत झाले नसून, याचा थेट फटका आता नागरिकांच्या खिशाला बसत आहे.

गेल्या महिनाभरात भाजीपाल्याच्या दरात तब्बल ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली असून, कडक उन्हामुळे उत्पादनात झालेली घट आणि मालाची खराब होणारी स्थिती यामुळे भाजीपाला ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.

किचनचे बजेट कोलमडले
जळगावच्या बाजारपेठेत सध्या भाजीपाल्याची आवक कमालीची घटली आहे. मेथी, पालक यांसारख्या पालेभाज्या असोत की भेंडी, टमाटे, मिरची यांसारख्या फळभाज्या, सर्वांचेच भाव कडाडले आहेत. लिंबाच्या दराने तर उच्चांक गाठला असून, गेल्या महिन्यात ८० रुपये किलो मिळणारे लिंबू आता १७० ते १८० रुपयांवर पोहोचले आहेत. कोथिंबिरीची एक जुडी ४० रुपयांना मिळत असल्याने सामान्य गृहिणींचे घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

विक्रेतेही अडचणीत
केवळ ग्राहकच नाही, तर विक्रेतेही या उष्णतेमुळे हैराण आहेत. प्रचंड तापमानामुळे भाजीपाला लवकर सुकत असून तो खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे विक्रेत्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. बाजारात ग्राहकांची संख्याही रोडावली असून, महागड्या भाजीपाल्यामुळे खरेदीकडे कल कमी झाल्याचे चित्र आहे.

दरात आणखी वाढीची शक्यता
मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजीपाल्याची आवक अधिक घटून दर पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. "घरातील रोजची भाजी काय करावी, हा मोठा प्रश्न पडला आहे," अशी हतबल प्रतिक्रिया जळगावमधील गृहिणींनी दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News