Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जळगावातील अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग

जळगावातील अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग

Live Trends News 11 hrs ago

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गुरांच्या बाजाराजवळील सेक्टर एन-५ परिसरात असलेल्या अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीज कंपनीमध्ये मंगळवारी (दि. २३) सायंकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजच्या परिसरात सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. कंपनीचे श्री. जितेंद्र अग्रवाल यांनी तातडीने अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. आगीत कंपनीतील तेल, पुठ्ठा, बॉयलर, पंखे तसेच संबंधित रूममधील इतर साहित्य जळून नुकसान झाले. परिसरात ज्वलनशील साहित्य असल्याने आग वेगाने पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाण्याचा जोरदार मारा करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.

घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने अत्यंत सावधगिरीने आणि धाडसाने काम करत आगीचा फैलाव रोखला. त्यांच्या तत्पर प्रयत्नांमुळे कंपनीतील मोठे नुकसान तसेच संभाव्य जीवितहानी टळली. आग विझविण्याच्या मोहिमेत अधिकारी भारत बारी यांच्यासह वाहन चालक देविदास सुरवाडे, संजय भोईटे आणि दीपक चौधरी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच फायरमन रोहिदास चौधरी, सुमित साळवे, नवाल शंकरपाळ, दीपक रोंदडे, जगदीश साळुंखे आणि संदीप कोळी यांनीही जीवाची पर्वा न करता आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.

औद्योगिक परिसरात आग लागल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र अग्निशमन दलाच्या वेळीच मिळालेल्या प्रतिसादामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. या कारवाईबद्दल परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक केले असून त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे समाधान व्यक्त केले. जळगावातील अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये लागलेल्या आगीने काही काळासाठी परिसरात खळबळ उडाली होती. मात्र अग्निशमन दलाच्या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे आग आटोक्यात येऊन मोठी हानी टळली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News