Dailyhunt
जिद्द आणि मेहनतीचे फळ! कीर्ती महाजनचे आदर्श कन्या विद्यालयात सुवर्णयश

जिद्द आणि मेहनतीचे फळ! कीर्ती महाजनचे आदर्श कन्या विद्यालयात सुवर्णयश

Live Trends News 3 days ago

डगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अशक्य काहीच नसते, हे पुन्हा एकदा भडगावच्या लेकीने सिद्ध करून दाखवले आहे. येथील आदर्श कन्या विद्यालयाची हुशार विद्यार्थिनी कीर्ती विजय महाजन हिने बारावी विज्ञान शाखेत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.

तिच्या या 'दैदिप्यमान' कामगिरीने संपूर्ण तालुक्यात तिचे कौतुक होत असून, भडगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कीर्तीने सुरुवातीपासूनच अभ्यासात सातत्य आणि जिद्द ठेवली होती. कोणत्याही शिकवणीपेक्षा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवत तिने विज्ञान शाखेसारख्या कठीण विषयात हे यश खेचून आणले. तिच्या या यशाची दखल घेत स्थानिक पत्रकार बांधवांनी तिची विशेष भेट घेऊन तिचा गौरव केला.

यावेळी पत्रकार आबा महाजन, सागर महाजन, चेतन महाजन आणि विजय महाजन यांनी कीर्तीच्या निवासस्थानी जाऊन तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. "ग्रामीण भागातील मुली आज शिक्षणाच्या जोरावर आभाळाला गवसणी घालत आहेत, कीर्तीचे यश हे इतर विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आहे," अशा भावना यावेळी पत्रकारांनी व्यक्त केल्या.

केवळ कुटुंबच नव्हे, तर आदर्श कन्या विद्यालयाचे शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांनीही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. कीर्तीला भविष्यात उच्च शिक्षण घेऊन देशसेवा करण्याची इच्छा असून, तिच्या या वाटचालीस सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News