Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जिल्हाधिकारी रोहन घुगे दर गुरुवारी नागरिकांच्या भेटीला ; QR कोडद्वारे तक्रारींचा रिअल टाइम मागोवा

जिल्हाधिकारी रोहन घुगे दर गुरुवारी नागरिकांच्या भेटीला ; QR कोडद्वारे तक्रारींचा रिअल टाइम मागोवा

Live Trends News 1 week ago

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात नागरिकांच्या तक्रारी आणि प्रशासकीय प्रश्नांचे स्थानिक पातळीवर जलद, पारदर्शक आणि कालबद्ध निवारण व्हावे या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख असा 'जनसमाधान बैठक' हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे आता नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी थेट जिल्हा मुख्यालय गाठण्याची गरज भासणार नसून, उपविभागीय स्तरावरच प्रशासनाशी संवाद साधून प्रश्न मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हाधिकारी रोहन घुगे स्वतः दर गुरुवारी संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकणार आहेत. त्यामुळे महसूल, प्रशासन आणि विविध विभागांशी संबंधित तक्रारींचे स्थानिक पातळीवरच तातडीने निराकरण होण्यास मदत होणार आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी ही योजना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.

जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण प्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. 'जनसमाधान पोर्टल' आणि 'क्यूआर कोड' प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांनी बैठकीत सादर केलेल्या प्रत्येक अर्जाचे तात्काळ डिजिटायझेशन केले जाणार आहे. अर्ज स्कॅन करून तत्काळ पोर्टलवर नोंदवण्यात येईल आणि प्रत्येक अर्जाला स्वतंत्र QR कोड देण्यात येणार आहे. हा QR कोड मुद्रित स्वरूपात अर्जदाराला देण्यात येणार असल्याने नागरिकांना त्यांच्या तक्रारीची सद्यस्थिती घरबसल्या मोबाईलवर पाहता येणार आहे.

नागरिक QR कोड स्कॅन करून संबंधित तक्रारीवर कोणती कार्यवाही झाली, कोणत्या विभागाकडे प्रकरण प्रलंबित आहे आणि निवारणाची सद्यस्थिती काय आहे, याची अद्ययावत माहिती थेट मोबाईलवरून पाहू शकतील. याशिवाय, एखादा अर्ज प्रलंबित राहू नये म्हणून पोर्टलच्या माध्यमातून संबंधित कार्यालयांना स्वयंचलित प्रशासकीय स्मरणपत्रेही पाठवली जाणार आहेत. त्यामुळे कामकाजात गती येण्याबरोबरच प्रत्येक विभागाची उत्तरदायित्वही निश्चित होणार आहे.

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, 'जनसमाधान बैठक' ही सर्वसामान्य नागरिकांच्या वैयक्तिक आणि सामूहिक तक्रारींसाठी आहे. त्यामुळे माहिती अधिकार कायद्यांतर्गत दाखल अर्ज, लोकशाही दिनासाठीचे अर्ज, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सादर करावयाच्या तक्रारी, न्यायालयीन किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि सेवाविषयक मागण्या या बैठकीत स्वीकारल्या जाणार नाहीत.

जळगाव जिल्ह्यातील आठ उपविभागीय अधिकारी कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात चक्राकार पद्धतीने दर गुरुवारी सकाळी या बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. पहिल्या फेरीअंतर्गत फैजपूर उपविभागात ४ जून, पाचोरा येथे ११ जून, भुसावळ येथे १८ जून, एरंडोल येथे २५ जून, चाळीसगाव येथे २ जुलै, अमळनेर येथे ९ जुलै, जामनेर येथे १६ जुलै आणि जळगाव उपविभागात २३ जुलै रोजी जनसमाधान बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक उपविभागात सुमारे ६० दिवसांनी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याने नागरिकांना नियमितपणे प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

या उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. "क्षेत्रीय स्तरावरच प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे आणि नागरिकांचे प्रश्न वेळेत मार्गी लागावेत, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण व दूरवरच्या भागातील नागरिकांनी आपल्या उपविभागाच्या नियोजित दिवशी उपस्थित राहून आपल्या रास्त तक्रारी आणि निवेदने प्रशासनासमोर मांडावीत," असे त्यांनी म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News