Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रंगला 'यलो डे'चा उत्साह ; चिमुकल्यांनी दिला रंगांच्या माध्यमातून शिक्षणाचा संदेश

मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रंगला 'यलो डे'चा उत्साह ; चिमुकल्यांनी दिला रंगांच्या माध्यमातून शिक्षणाचा संदेश

Live Trends News 1 week ago

रायपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रायपूर येथे मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये २९ जुलै २०२६ रोजी चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष 'यलो डे' (पिवळा रंग दिन) उपक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.

शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून या उपक्रमाला आकर्षक स्वरूप दिले. रंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

यावेळी सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पिवळ्या रंगाचा ड्रेस कोड परिधान करून शाळेत हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांनी पपई, आंबा, केळी, अननस, मका, मोसंबी, सूर्यफूल, झेंडू, स्कूल बस, सूर्य, मधमाशी, वाघ आदी पिवळ्या रंगाशी संबंधित विविध वस्तूंच्या आकर्षक क्राफ्ट वेशभूषा सादर केल्या. या अनोख्या उपक्रमामुळे शाळेचे वातावरण रंगमय झाले होते.

यलो डे निमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक व शैक्षणिक उपक्रम घेण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचे महत्त्व समजावे यासाठी टिफिनमध्ये पिवळ्या रंगाशी संबंधित पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्यात आला. यामध्ये खमंग मुगाची खिचडी, डाळ-भात, मखाने, पिवळ्या रंगाचे पदार्थ, मटकी उसळ आदी पदार्थांचा समावेश होता. यावेळी मा. सौ. भारती परदेशी मॅडम यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना रंगांचे महत्त्व समजावून सांगितले. लहान वयात रंगांची ओळख करून देणे, वस्तूंचे निरीक्षण करणे आणि त्यातून शिकण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी बनवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

'यलो डे' सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती, निरीक्षण क्षमता आणि संज्ञानात्मक विकास वाढण्यास मदत होते. पिवळ्या रंगाशी संबंधित वस्तू ओळखणे, हस्तकला करणे, कागद फाडून चिकटवणे, रंगकाम करणे यामुळे विद्यार्थ्यांच्या सूक्ष्म व स्थूल स्नायू कौशल्यांचा विकास होतो. तसेच सर्व विद्यार्थी एकसारख्या रंगाच्या वेशभूषेत सहभागी झाल्याने त्यांच्यात एकता, आपलेपणा आणि मैत्रीची भावना निर्माण होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील लाजाळूपणा कमी होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. विविध खेळ, फुगे, लहान शर्यती आणि सामूहिक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्यांनाही चालना मिळते. अभ्यासाला आनंददायी स्वरूप देण्याचे काम अशा उपक्रमांमधून होते. मजेत शिकण्याच्या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढते आणि शाळेबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो.

या विशेष उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सोनाली देसले मॅडम, सौ. मयुरी वाघ मॅडम, कु. शिवानी पाटील मॅडम आणि कु. चंचल वानखेडे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमधील यलो डे उपक्रमातून विद्यार्थ्यांना रंगांची ओळख, सर्जनशीलता, आरोग्यदायी आहार आणि सामूहिक सहभागाचे महत्त्व शिकविण्यात आले. रंगांच्या माध्यमातून शिक्षण अधिक आनंददायी करण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News