Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुक्ताईनगर महावितरणच्या ब्रेकडाऊन मेंटेनन्स कामांची चौकशी करा ; आ. एकनाथराव खडसेंची मागणी

मुक्ताईनगर महावितरणच्या ब्रेकडाऊन मेंटेनन्स कामांची चौकशी करा ; आ. एकनाथराव खडसेंची मागणी

Live Trends News 2 weeks ago

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर महावितरण विभागातील ब्रेकडाऊन मेंटेनन्सअंतर्गत गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या कामांची सखोल चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा, अशी मागणी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य तथा माजी मंत्री आ.

एकनाथराव खडसे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महावितरणच्या जळगाव परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र देऊन मागील तीन वर्षांतील कामे, खर्च, मंजूर निधी आणि संबंधित कंत्राटदारांना देण्यात आलेल्या निधीची माहिती मागविली आहे.

आ. खडसे यांनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये मुक्ताईनगर विभागात सन २०२४-२५, २०२५-२६ आणि २०२६-२७ या कालावधीत ब्रेकडाऊन मेंटेनन्सअंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या कामांवर झालेला खर्च आणि प्रत्यक्षात करण्यात आलेल्या कामांची पडताळणी करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी पत्राद्वारे नमूद केले आहे. मुक्ताईनगर विभागात एम/एस तृप्तेश्वर इलेक्ट्रिकलचे राजू पाटील, मुक्ताईनगर आणि एम/एस निलक्षी इलेक्ट्रिकलचे सौरभ विधाते, मोताळा, जिल्हा बुलढाणा यांच्या फर्ममार्फत करण्यात आलेल्या ब्रेकडाऊन मेंटेनन्सच्या कामांचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आ. खडसे यांनी केली आहे. संबंधित फर्मना कोणती कामे देण्यात आली, ती प्रत्यक्षात किती प्रमाणात पूर्ण झाली आणि त्यावर किती खर्च झाला, याची माहिती तपासण्यात यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

विशेषतः मागील तीन वर्षांच्या कालावधीत ब्रेकडाऊन मेंटेनन्सच्या कामांसाठी संबंधित फर्मना किती निधी अथवा बजेट मंजूर करण्यात आले, त्यापैकी प्रत्यक्ष किती रक्कम खर्च करण्यात आली आणि कोणकोणती कामे करण्यात आली, याचा सविस्तर तपशील सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंजूर निधी आणि प्रत्यक्ष खर्च यामध्ये काही तफावत आहे का, तसेच करण्यात आलेल्या कामांचा दर्जा समाधानकारक आहे का, याचीही पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. वीज वितरण व्यवस्थेत ब्रेकडाऊन मेंटेनन्सची कामे महत्त्वाची मानली जातात. वीजपुरवठ्यात बिघाड झाल्यानंतर तो तातडीने दूर करून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी या कामांवर खर्च केला जातो. त्यामुळे अशा कामांमध्ये खर्च झालेल्या निधीचा योग्य वापर झाला आहे का आणि प्रत्यक्षात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत का, याबाबत पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे या मागणीमुळे अधोरेखित झाले आहे.

आ. खडसे यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याची स्पष्ट मागणी केली आहे. त्यांच्या पत्राची प्रत महावितरणचे अधीक्षक अभियंता, जळगाव विभाग तसेच कार्यकारी अभियंता, मुक्ताईनगर विभाग यांनाही देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात कोणती कार्यवाही केली जाते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुक्ताईनगर महावितरण विभागातील मागील तीन वर्षांतील ब्रेकडाऊन मेंटेनन्सच्या कामांचा दर्जा, मंजूर निधी, प्रत्यक्ष खर्च आणि संबंधित कंत्राटदारांना करण्यात आलेल्या निधी वितरणाची माहिती चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे. या चौकशीमुळे कामांच्या अंमलबजावणीबाबत वस्तुस्थिती स्पष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News