Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पूरानंतरही सतर्क राहा - जिल्हाधिकारी रोहन घुगे

पूरानंतरही सतर्क राहा - जिल्हाधिकारी रोहन घुगे

Live Trends News 3 weeks ago

ळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीनंतर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. आपत्तीच्या काळात केवळ बचावकार्य महत्त्वाचे नसून, त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे प्रभावी व्यवस्थापन करणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

पूरानंतर दूषित पाणी, रोगराई तसेच सर्पदंशासारख्या घटनांचा धोका वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसोबतच पुनर्वसन आणि आरोग्यविषयक उपाययोजनांवरही विशेष लक्ष द्यावे लागते. पूर ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते किंवा पाणी दूषित होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी वापरावे. कुठेही दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा. आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी ड्राय रेशनची व्यवस्था करण्याबाबत सेवाभावी संस्था तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. गरजू नागरिकांना आवश्यक मदत वेळेत मिळावी यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत असून, विविध यंत्रणांच्या माध्यमातून मदतकार्य सुरू आहे.

पूरानंतर रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, आवश्यक औषधांचा साठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पूरस्थितीनंतर सर्पदंश, श्वानदंश आणि विंचूदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन सर्व आरोग्य केंद्रांवर आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. संबंधित आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, मदत व बचाव कार्यासाठी नागपूर येथील एनडीआरएफ पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकात तीन अधिकारी आणि ३१ जवानांचा समावेश असून, ते मदतकार्य, बचाव मोहिमा तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करणार आहेत. नागरिकांनी स्वतःची सुरक्षितता जपावी तसेच कोणतीही अडचण, समस्या किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी. वेळेत माहिती मिळाल्यास संबंधित यंत्रणांना त्वरित उपाययोजना करणे शक्य होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News