Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक एस. लाडवंजारी यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक एस. लाडवंजारी यांची नियुक्ती

Live Trends News 1 week ago

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक एस. लाडवंजारी यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वावर पक्षश्रेष्ठींनी पुन्हा विश्वास व्यक्त केल्याने जळगावमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुधवारी (८ जुलै २०२६) झालेल्या या नियुक्ती सोहळ्यास प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुनील भुसारा आणि प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अशोक लाडवंजारी यांच्यावर जळगाव महानगरातील पक्षसंघटना अधिक बळकट करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. अशोक लाडवंजारी यांची महानगर जिल्हाध्यक्षपदी ही दुसऱ्यांदा नियुक्ती झाली आहे. यापूर्वीही त्यांनी महानगराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले असून, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात सक्रियपणे कार्यरत आहेत. राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही अशोक लाडवंजारी यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ते जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक राहिले असून जिल्हा नियोजन समिती सदस्य, महानगरपालिका स्थायी समिती सदस्य तसेच शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सध्या ते नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष असून श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सचिव म्हणूनही कार्यरत आहेत.

नाथ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गरजू नागरिकांना कपडे, ब्लँकेट, अन्नधान्य वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण तसेच गरजू महिलांना साड्यांचे वाटप यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. महानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अशोक लाडवंजारी यांनी पक्षाची संघटना शहरातील प्रत्येक वार्डात आणि घराघरात अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या विचारांचा प्रसार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या नियुक्तीबद्दल आमदार एकनाथराव खडसे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, प्रदेश सरचिटणीस ॲड. रविंद्र पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, जिल्हा निरीक्षक भास्कर काळे, प्रदेश चिटणीस एजाज मलिक, जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, मंगला पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, समन्वयक विकास पवार, माजी नगरसेवक राजू मोरे, सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संग्रामसिंह सूर्यवंशी, युवक महानगराध्यक्ष विनायक पाटील, माजी महानगराध्यक्ष रिंकू चौधरी, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पगारे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौरव वाणी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News