Dailyhunt
तापी परिसरातील पहिल्या शासनमान्य मोफत डायलिसिस सेंटरचे उद्या लोकार्पण ; आ. अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश

तापी परिसरातील पहिल्या शासनमान्य मोफत डायलिसिस सेंटरचे उद्या लोकार्पण ; आ. अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश

Live Trends News 1 week ago

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांसाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वपूर्ण सुविधा आता रावेरमध्ये उपलब्ध होणार असून, तापी परिसरातील पहिले शासनमान्य मोफत डायलिसिस सेंटर उद्या महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू होत आहे.

या केंद्रामुळे परिसरातील हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या या डायलिसिस सेंटरचे लोकार्पण दि. १ मे रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरातील निवडक आरोग्य संस्थांमध्ये डायलिसिस सेंटर सुरू करण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून, त्यामध्ये रावेर ग्रामीण रुग्णालयाचा समावेश करण्यात आल्याने या भागाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या नव्या सुविधेमुळे रावेरसह यावल, फैजपूर, मुक्ताईनगर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना थेट लाभ होणार आहे. यापूर्वी डायलिसिससाठी रुग्णांना जळगावपर्यंत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वेळ, पैसा आणि शारीरिक त्रास या तिन्ही बाबींचा मोठा ताण सहन करावा लागत होता. मात्र आता स्थानिक पातळीवरच उपचार उपलब्ध होणार असल्याने रुग्णांचे हाल मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.

खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसिस उपचारासाठी मोठा खर्च करावा लागत असताना, शासनमान्य या केंद्रात रुग्णांना मोफत सेवा मिळणार असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. नियमित डायलिसिसची गरज असलेल्या रुग्णांसाठी ही सुविधा जीवनदायी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात आमदार अमोल जावळे यांनी सांगितले की, रुग्णांना वेळेवर आणि जवळच्या ठिकाणी उपचार मिळणे अत्यंत आवश्यक असते. रावेर येथे डायलिसिस सेंटर सुरू होणे म्हणजे परिसरातील नागरिकांसाठी मोठी आरोग्य सुविधा उपलब्ध होणे असून, या केंद्रामुळे अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्या होणाऱ्या या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यास लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, संबंधित अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या निर्णयाचे परिसरात स्वागत होत असून, आमदार जावळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच ही सुविधा रावेरला मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News