Dailyhunt
विद्यापीठात बंद बस सेवेमुळे विद्यार्थिनींचा संताप ; शिवाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा

विद्यापीठात बंद बस सेवेमुळे विद्यार्थिनींचा संताप ; शिवाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा

Live Trends News 1 week ago

ळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात एप्रिल महिन्यात तापमानाने विक्रमी ४५ अंशांचा टप्पा ओलांडला असताना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनींना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे.

विद्यार्थिनींसाठी उपलब्ध असलेली बॅटरीवर चालणारी बस सेवा दीर्घकाळापासून बंद असल्याने वसतिगृहापासून शैक्षणिक विभागांपर्यंतचा २ ते ३ किलोमीटरचा प्रवास त्यांना कडक उन्हात पायी करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी ब्रिगेडने विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या निवेदनानुसार, विद्यापीठाचा परिसर विस्तीर्ण असून मुलींच्या वसतिगृहापासून विविध विभागांपर्यंतचे अंतर लक्षणीय आहे. वाढत्या तापमानामुळे विद्यार्थिनींना उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून, आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत वर्गांसाठी ये-जा करताना विद्यार्थिनींची अवस्था बिकट होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विद्यापीठाकडे ८ ते १० आसनी बॅटरी संचलित वाहन उपलब्ध असतानाही ते बंद अवस्थेत असल्याची बाब उघड झाली आहे. ही सेवा विद्यार्थिनींच्या सोयीसाठी सुरू करण्यात आली होती, मात्र तिची दुरवस्था आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे विद्यार्थिनींच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवाय, नॅक (NAAC) समितीनेही विद्यापीठाच्या अंतर्गत वाहतुकीसाठी अशी सुविधा असावी, अशी स्पष्ट शिफारस केली असल्याचे ब्रिगेडने अधोरेखित केले आहे.

निवेदनात दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रथम, बंद असलेली बॅटरी बस सेवा २४ तासांच्या आत दुरुस्त करून तात्काळ सुरू करावी. दुसरे म्हणजे, विद्यार्थिनींची संख्या लक्षात घेता एक बस अपुरी ठरत असल्यास अतिरिक्त नवीन बसची तातडीने खरेदी करावी. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा वाढत्या उष्णतेत विद्यार्थिनींच्या समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News