Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
यावलमध्ये आदिवासी वसतिगृहासाठी जागा मंजूर; आ. अमोल जावळेंच्या प्रयत्नांना यश

यावलमध्ये आदिवासी वसतिगृहासाठी जागा मंजूर; आ. अमोल जावळेंच्या प्रयत्नांना यश

Live Trends News 1 week ago

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल व रावेर तालुक्यातील आदिवासी मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मौजे यावल, ता. यावल, जि. जळगाव येथील गट क्रमांक १२३३ मधील शासकीय जागा वसतिगृहासाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी मिळाली असून, जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशान्वये ही जागा संबंधित आदिवासी विभागास वसतिगृहाच्या प्रयोजनासाठी वितरित करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे यावल तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना सुरक्षित, दर्जेदार आणि सोयीस्कर निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना याचा विशेष फायदा होऊन त्यांच्या शिक्षणाला तसेच शैक्षणिक प्रगतीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

यावल व रावेर तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृहाची आवश्यकता लक्षात घेऊन आमदार अमोलभाऊ जावळे यांनी वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, वसतिगृह उभारण्यासाठी शासकीय जागा मंजूर करण्यात आली आहे.

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध शासकीय सुविधा आणि कार्यालये यावल येथे उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही प्रयत्न सुरू ठेवण्याचा मानस आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केला आहे.

मंजूर जागेचा वापर केवळ निश्चित केलेल्या प्रयोजनासाठी करणे, निर्धारित कालावधीत बांधकाम पूर्ण करणे आणि आवश्यक त्या सक्षम प्राधिकरणांची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. आदेशातील सर्व अटी व शर्तींचे पालन संबंधित विभागाला करावे लागणार आहे.

मंजूर जागेचा ताबा देणे, जागेची मोजणी व सीमांकन करणे तसेच महसूल अभिलेखात आवश्यक नोंदी घेण्याची प्रक्रिया संबंधित विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यानंतर वसतिगृहाच्या प्रत्यक्ष बांधकाम प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात असून, वसतिगृहासाठी शासकीय जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल यावल तालुक्यातील आदिवासी समाजाच्या वतीने आमदार अमोलभाऊ जावळे यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Live Trends News