लोकमंथन

461k Followers

आत्मनिर्भर श्रद्धाची वाटचाल प्रेरणादायी ः नंदकुमार झावरे

09 Dec 2020.06:00 AM

60 म्हशीचा सांभाळ करत, कुटुंबाला हातभार लावून आत्मर्निभरतेकडे वाटचाल

निघोज/प्रतिनिधी ः निघोज येथील मुलीकादेवी महाविद्यालयातील तृतीय वर्षातील कु. श्रद्धा सत्यवान ढवण या विद्यार्थिनीने स्वतःचे शिक्षण सुरू ठेवत साठ म्हशीचा सांभाळ करून ती कुटुंबाला हातभार लावत आहे. केंद्रशासन, राज्यशासन, पुणे विद्यापीठ व आत्मनिर्भर भारत या योजनेने श्रद्धाच्या कामगिरीची दखल घेतली. याबद्दल महाविद्यालयात श्रद्धाच्या यशाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर होते.

या प्रसंगी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष श्री.नंदकुमार झावरे यांनी श्रद्धाचे अभिनंदन केले व तिला शुभेच्छा दिल्या.

आत्मनिर्भर श्रद्धाची वाटचाल ही प्रेरणादायी असून ती देशपातळीवरील व राज्यपातळीवरील मुलीसाठी दिशादर्शक आहे. निघोज येथे महाविद्यालय स्थापनेचा उद्देश गुणवंत व कीर्तीवंत विद्यार्थ्यांच्या रूपाने आज देश पातळीवर समोर आला आहे. ग्रामीण भागात जिद्दी व कष्टाळू विद्यार्थी असतात. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत यासाठी संस्थेने निघोज महाविद्यालयास सर्व सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्यामुळे महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी असणारी आवड व महाविद्यालय माध्यमातून मिळवलेला नावलौकिक जिल्हा मराठा संस्थेचा आलेख उंचावणारा आहे. श्रद्धा स्वत: आत्मनिर्भर तर बनलीच पण समाजात मुलीही आत्मनिर्भर बनतात हे यशोगाथेतून तिने दाखविले आहे. असेही झावरे यावेळी म्हणाले.

डॉ. सहदेव आहेर यांनी श्रद्धाच्या यशाचे गमक व तिची आत्मनिर्भर यशोगाथा सांगितली. तसेच निघोज महाविद्यालयाच्या माध्यमातून या तालुक्यातील उज्ज्वल यशाद्वारे विद्यार्थ्यांच्या वैभव स्पष्ट झालेले आहे. आजही ऑनलाइन माध्यमातून शिक्षणाबरोबरच विविध उपक्रम महाविद्यालयात राबविले जातात.

तसेच नॅक मूल्यांकन अहवालही महाविद्यालयाने सादर केला आहे व यासाठी महाविद्यालय सज्जही झालेले आहे असेही डॉ. सहदेव आहेर यांनी सांगितले. यावेळी श्रद्धा ढवण यांनी आपल्या यशाचे गमक सांगितले तर श्रद्धाचे वडील सत्यवान ढवण यांनी स्वतःचे शिक्षण सुरू ठेवत श्रद्धा कुटुंबाला हातभार लावत आहे व ती आत्मनिर्भर बनली आहे असे सांगितले.

Disclaimer

Disclaimer

This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt Publisher: Lokmanthan

#Hashtags