Dailyhunt
अचूक पंचनामे करून अहवाल सादर करा; पालकमंत्री विखेंकडून नुकसानीची पाहणी; प्रशासनास निर्देश

अचूक पंचनामे करून अहवाल सादर करा; पालकमंत्री विखेंकडून नुकसानीची पाहणी; प्रशासनास निर्देश

शिर्डी : अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे राहाता तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या आणि अन्य नुकसानीचे महसूल व कृषी भागाने एकत्रितपणे १०० टक्के अचूक पंचनामे करून अहवाल सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले.

गुरुवारी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून नुकसानीची माहिती घेतली. तसेच, बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी मौजे पाथरे (बु.) येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

राहाता तालुक्यातील पाथरे (बु.) येथील शेतकरी संजय भाऊसाहेब घोलप व गोपालक सोपान घोलप यांच्या शेताला व गोठ्याला पालकमंत्र्यांनी भेट दिली. वादळाने पडलेल्या वीजवाहक तारा व विजेच्या खांबांच्या समस्या तातडीने सोडवून गावातील वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देशही वीज वितरण कंपनीला दिले.

जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत झालेल्या पावसाने ४२ हजार ६१८ शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी पुन्हा जिल्ह्याच्या बहुतांशी भागात झालेल्या पावसाने जामखेडमध्ये १ पशुधन दगावले असून, संगमनेरमध्ये २, राहुरीत ९ आणि कोपरगावमध्ये १ घराचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे १०० टक्के पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

या पाहणी दौऱ्यावेळी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, नायब तहसीलदार हेमंत पाटील, मंडळ कृषी अधिकारी रमेश चौपडे, सहायक कृषी अधिकारी श्रीमती मीना जाधव, वीज वितरण कंपनीचे अभियंता गाडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संपत तांबे उपस्थित होते. तसेच, बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब कडू, सरपंच उमेश घोलप, संचालक अशोकराव घोलप, आबासाहेब घोलप, भाऊसाहेब घोलप, आप्पासाहेब दिघे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

१८०० हेक्टरचे नुकसान ; अडीच हजार शेतकऱ्यांना फटका

राहाता तालुक्यात १८ मार्च, ३० मार्च व १ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या पावसाने १ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील सुमारे २ हजार ७५९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, कांदा, द्राक्ष, मका, डाळिंब, हरभरा, टरबूज आणि आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती पालकमंत्री विखे पाटील यांनी पाहणीनंतर दिली. याशिवाय शेतामध्ये ठेवलेल्या उत्पादित मालाचे तसेच वाऱ्याच्या वेगाने शेडनेट व पॉलीहाऊसचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan