पुणे : देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची यंदाच्या प्रतिष्ठेच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देणे, दहशतवादविरोधी कारवायांमधील योगदान आणि गुप्तचर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
टिळक स्मारक न्यासाचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त 1 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता पुण्यातील टिळक स्मारक मंदिराच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या पुरस्कारामध्ये स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते. लोकमान्य टिळक यांच्या स्मरणार्थ 1983 पासून राष्ट्रहितासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांना हा सन्मान प्रदान केला जात आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्योगपती राहुल बजाज, शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. के. सिवन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
उत्तराखंडमध्ये जन्मलेले अजित डोवाल हे भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी गुप्तचर यंत्रणेत दीर्घकाळ महत्त्वाची जबाबदारी सांभाळली असून, 2014 पासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. देशाची अंतर्गत सुरक्षा, सीमापार दहशतवादाचा मुकाबला आणि भारताच्या धोरणात्मक भूमिकेला बळकटी देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे डॉ. रोहित टिळक यांनी सांगितले.
The post अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर appeared first on Lokmanthan | लोकमंथन.
