मुंबई : आर्थिक गैरव्यवहार आणि संशयास्पद व्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अशोक खरात याला विशेष न्यायालयाने सहा दिवसांची अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी कोठडी सुनावली. पतसंस्थांतील बनावट खात्यांच्या माध्यमातून पैशांची फेरफार आणि व्यवहार लपवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप तपास यंत्रणेने न्यायालयात केला.
सुनावणीदरम्यान तपास यंत्रणेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, खरातने एका नागरी पतसंस्थेत अनेक व्यक्तींच्या नावाने तब्बल 63 खाती उघडली होती. या सर्व खात्यांशी त्याचाच दूरध्वनी क्रमांक जोडण्यात आला होता. अनेक खात्यांमध्ये नामनिर्देशित व्यक्ती म्हणूनही खरातचेच नाव नोंदविण्यात आले होते. त्यामुळे या व्यवहारांचा प्रत्यक्ष लाभार्थी तोच असल्याचा संशय तपास यंत्रणेने व्यक्त केला.
या खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर रोकड जमा व काढण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. कोट्यवधी रुपयांची ही रक्कम नेमकी कुठून आली आणि कुठे वळवण्यात आली, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे यंत्रणेने न्यायालयात नमूद केले. काही व्यवहारांमध्ये ठेव पावत्या न भरताच थेट रोकड खात्यांत जमा करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. तपास यंत्रणेच्या मते, खरात एका संस्थेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत होता.
त्याच्या नावाशी संबंधित 34 बेनामी मुदतठेवी खाती उघडण्यात आली होती. 2014 ते 2024 या कालावधीत या खात्यांतून मोठ्या प्रमाणावर रोकड व्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला. या ठेवींमधील रक्कम अखेरीस खरातकडेच पोहोचल्याने तो या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.याशिवाय खरातच्या पत्नीच्या खात्यांमध्येही मोठ्या रकमा जमा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. काही मालमत्तांची खरेदीही या निधीतून झाल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणेने मांडला. संबंधित बँकांची चौकशी करणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले. दुसरीकडे, खरातच्या बाजूने करण्यात आलेल्या युक्तिवादात हे प्रकरण गंभीर आर्थिक गुन्ह्याच्या चौकटीत बसत नसल्याचा दावा करण्यात आला.

