पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अभूतपूर्व यश संपादन करत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यांनी तब्बल 2 लाख 18 हजार 930 मतांच्या फरकाने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत नवा उच्चांक प्रस्थापित केला.
या विजयामुळे देशभरात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. यापूर्वीचा विक्रम माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता. 2019 मध्ये त्यांनी मिळवलेल्या मताधिक्यालाही सुनेत्रा पवार यांनी मागे टाकले. मतमोजणीच्या विसाव्या फेरीपर्यंतच त्यांनी प्रचंड आघाडी घेतली होती. त्या वेळीच त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. अखेरच्या निकालात त्यांनी दोन लाखांहून अधिक मतांचा टप्पा पार करत बारामतीच्या राजकारणात नवे पर्व सुरू केल्याचे चित्र स्पष्ट झाले. बारामती मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. 2019 मध्ये त्यांनी सुमारे 70 टक्के मतदानात 1 लाख 95 हजारांहून अधिक मते मिळवत मोठे मताधिक्य नोंदवले होते. त्याआधीच्या निवडणुकांमध्येही त्यांनी सातत्याने मोठे विजय मिळवले होते.
बारामतीच्या विकासासाठी कटिबद्ध : सुनेत्रा पवार
विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, ही त्यांची पहिलीच निवडणूक असून इतक्या मोठ्या प्रमाणावर जनतेचा पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. त्यांनी सांगितले की, बारामतीकरांनी अजित पवार यांच्या विकासकामांवर विश्वास दाखवत हा कौल दिला आहे. बारामतीतील जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी हा विश्वास पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. संपूर्ण बारामती आपले कुटुंब असून विकासाची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशभरात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम
बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांनी केवळ विजयच मिळवला नाही, तर राजकारणाच्या इतिहासात एक सुवर्णपानही लिहिले आहे. सुनेत्रा पवार यांनी 2 लाख 18 हजार 930 इतक्या प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याआधी देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान उत्तर प्रदेशातील साहिबाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कुमार शर्मा यांच्याकडे होता. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 2 लाख 14 हजार 835 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. सुनेत्रा पवार यांनी आता हा आकडा पार करत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे.

