कोपरगाव : संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या आठ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये आकर्षक वेतनावर नोकरीसाठी निवड झाली आहे. अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्रात कॉलेजमध्येच कंपन्यांकडून मुलाखती घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना अंतिम निकालापूर्वीच नोकरी मिळण्याचे स्वप्न साकार होत आहे.
विद्यार्थ्यांची दर्जेदार तयारी, कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि उद्योगाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांना कंपन्यांकडून पसंती मिळत आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या नियोजनबद्ध कार्यामुळे ही यशस्वी कामगिरी शक्य झाली असल्याचे कॉलेज प्रशासनाने सांगितले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या एकता मनोज आहेर हिची Faurecia India Limited मध्ये निवड झाली आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या गायत्री योगेश चौधरी, श्रद्धा माणिक दिघे, दाक्षयाणी विक्रम थोरात आणि चैताली बाळासाहेब थोरात यांची RKS Engineering Services मध्ये निवड झाली. मेकॅनिकल शाखेतील मयूर चंद्रकांत डागे याची Hi-Tech Radiators मध्ये, मेकॅट्रॉनिक्स शाखेतील प्रदीप अनिल जाधव याची Robowelt Systems Pvt Ltd मध्ये तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जय महेश भोसले याची Design Studio मध्ये निवड झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे व कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.
"मी राहुरी तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील आहे. संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाल्यानंतर माझ्या करिअरची दिशा निश्चित झाली. 'फ्लोअर क्लिनिंग रोबोट युजिंग सोलर एनर्जी' हा अंतिम वर्षाचा प्रोजेक्ट सादर केला. त्याच प्रोजेक्टमुळे मला Robowelt Systems Pvt Ltd मध्ये रोबोटिक्स इंजिनिअर म्हणून संधी मिळाली असे प्रदीप जाधव या विद्यार्थ्याने सांगितले.

