Dailyhunt
भोंदू खरातला उपमुख्यमंत्री शिंदेंचे 17 कॉल; सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांचा गंभीर आरोप

भोंदू खरातला उपमुख्यमंत्री शिंदेंचे 17 कॉल; सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांचा गंभीर आरोप

मुंबई : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणार्‍या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता दूरध्वनी संपर्कांच्या नोंदींवरून नवे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यात अनेक वेळा दूरध्वनीवर संभाषण झाले असून, इतर काही प्रमुख नेत्यांचाही संपर्क असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दमानिया यांनी सांगितले की, त्यांच्याकडे उपलब्ध झालेल्या दूरध्वनी तपशील नोंदींनुसार (सीडीआर) शिंदे आणि खरात यांच्यात एकूण 17 वेळा संभाषण झाले. त्यापैकी दहा कॉल येणारे तर सात कॉल जाणारे असल्याची माहिती त्यांनी दिली. यामधील एका संभाषणाची कालावधी सुमारे एकवीस मिनिटांचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या पार्श्‍वभूमीवर अशा संपर्कांचे कारण स्पष्ट करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. याचप्रमाणे, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांना मोठ्या प्रमाणावर फोन केल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, चाकणकर यांनी सुमारे एकशे सत्याहत्तर वेळा संपर्क साधला, तर त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांच्याकडूनही मोठ्या संख्येने कॉल झाल्याचे नोंदीत दिसत असल्याचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री आशिष शेलार, तसेच माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याही काही वेळा संपर्क झाल्याचे दमानिया यांनी नमूद केले. तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही काही कॉल झाल्याची माहिती त्यांनी दिली. दमानिया यांनी स्पष्ट केले की, ही माहिती त्यांना एका अज्ञात व्यक्तीकडून प्राप्त झाली असून, त्यांनी ती संबंधित यंत्रणांकडे सुपूर्द केली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक तसेच मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी ही माहिती पाठवली असून, विशेष तपास पथकाच्या अधिकार्‍यांनाही याबाबत कळवण्यात आले आहे.

चाकणकरांनी 177 कॉल्स केल्याची माहिती
या नोंदींमध्ये अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यातील संभाषणाचा कालावधी मोठ्या प्रमाणात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, दोघांमध्ये 177 कॉल्समध्ये एकूण सुमारे तेहतीस हजार सातशे सत्तावीस सेकंद इतका संवाद झाला असल्याचे नमूद आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधितांची भूमिका स्पष्ट व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, संबंधितांकडून याबाबत स्पष्टीकरण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अधिकृत पातळीवर या दाव्यांची पडताळणी अद्याप झालेली नसली, तरी तपास यंत्रणांकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan