Dailyhunt
छत्तीसगडमध्ये वाहन नदीत कोसळून चौघांचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये वाहन नदीत कोसळून चौघांचा मृत्यू

रायपूर : छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यातील गंडई गावाजवळ मध्यरात्री भीषण रस्ता अपघात घडून चार तरुणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पांडातराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर येथील बिरगाव परिसरातील सहा जण लग्न समारंभासाठी पंडरिया येथे गेले होते. समारंभ आटोपल्यानंतर ते मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या वाहनाने परतत असताना हा अपघात झाला. गंडईजवळील फोक नदीवरील पुलाजवळ तीव्र वळणावर वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट नदीत कोसळले. या अपघातात अरमान खान, सौंफ, अनस आणि कौनेन या चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

जुनैद रझा आणि आरजू खान हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रारंभी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले आणि त्यांनी पोलीसांना कळवले.

पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य राबविण्यात आले. मोठ्या प्रयत्नांनंतर जखमींना वाहनातून बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक तपासात अतिवेग हे अपघाताचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan