Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चीनमधील कोळशाच्या खाणीत भीषण स्फोट;८२ जणांचा मृत्यू, खाण व्यवस्थापकास अटक

चीनमधील कोळशाच्या खाणीत भीषण स्फोट;८२ जणांचा मृत्यू, खाण व्यवस्थापकास अटक

बीजिंग : उत्तर चीनमधील शान्शी प्रांतातील एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण मिथेन वायू स्फोटात ८२ कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. काहीजण अद्याप बेपत्ता असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, चांगझी शहरातील किनयुआन काउंटीमध्ये असलेल्या लियुशेन्यु कोळसा खाणीत हा भीषण स्फोट झाला असून, ही खाण शान्शी टोंगझोऊ कोल इंडस्ट्री ग्रुपद्वारे चालवली जाते. स्फोटानंतर शनिवारी पहाटे 6 वाजेपर्यंत 201 कामगारांना खाणीतून बाहेर काढण्यात यश आले, ज्यामध्ये 82 मृतांचा समावेश होता.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, खाणीच्या आत अचानक मोठ्या प्रमाणावर मिथेन गॅसचे एकत्रीकरण झाले आणि त्याचा स्फोट झाला. या स्फोटानंतर खाणीत अत्यंत विषारी आणि घातक अशा कार्बन मोनोऑक्साइड वायूचे प्रमाण खूपच वाढले. यामुळे अनेक जखमी कामगारांना श्वास घेणेही कठीण झाले आणि ते बेशुद्ध झाले, हेच त्यांच्या मृत्यूचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. अजूनही 9 कामगार खाणीत अडकले आहेत आणि ते बेपत्ता असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
या भीषण दुर्घटनेची दखल घेत चीनचे अध्यक्ष शी जिनिपिंग यांनी तात्काळ बचावकार्य अधिक वेगाने करण्याचे आणि जखमींना सर्वोत्कृष्ट उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, या घटनेला कारणीभूत असलेल्या आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी संबंधित खाण व्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटकही केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan