मुंबई : ठाण्यातील राजकारणात प्रभाव असलेल्या डावखरे कुटुंबात आता स्पष्ट राजकीय फूट दिसून आला आहे. भाजप नेते निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू प्रबोध डावखरे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले.
दिवंगत नेते वसंत डावखरे यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू केली होती. त्यानंतर डावखरे कुटुंब एकाच राजकीय भूमिकेत असल्याचे चित्र होते. मात्र प्रबोध डावखरे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे कुटुंबात राजकीय मतभेद उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षप्रवेशानंतर प्रबोध डावखरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांनी आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम केले आणि शेवटच्या काळातही राजकारणात यायचे असल्यास राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला होता. त्या भावनेतून आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रबोध डावखरे म्हणाले की, वसंत डावखरे यांनी ठाणे जिल्ह्यात पक्ष संघटना उभी करण्यासाठी मोठे योगदान दिले होते. आता त्याच विचारांचा वारसा पुढे नेत जिल्ह्यात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम केले जाईल. तसेच खासदार पार्थ पवार यांनी पक्षप्रवेशासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.

