Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

एकेकाळी महाराष्ट्रात अव्वल ठरलेले जळगाव जामोद बसस्थानक आज अस्तित्वासाठी वेठीस; प्रशासनाचा ढिसाळ कारभार

ळगाव जामोद : एकेकाळी स्वच्छतेच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात सलग चार ते पाच वर्षे अव्वल ठरलेले जळगाव जामोद बसस्थानक आज स्वतःच्या अस्तित्वासाठी अश्रू ढाळत आहे. येथील डेपो मॅनेजरचा कमालीचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे या बसस्थानकाचे वैभव आता पूर्णपणे धुळीस मिळाले असून, प्रवाशांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मे महिन्याचं रखरखतं ऊन, अंगाची लाहीलाही करणारी उष्णता… अशा परिस्थितीत जळगाव जामोद बसस्थानकावर प्रवाशांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. बसस्थानकावर 'थंडगार पाणी' अशी मोठी पाटी लावण्यात आली आहे, पण प्रत्यक्षात तिथल्या नळांना थेंबभरही पाणी नाही! पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांना या कडक उन्हात बाहेर भटकावे लागत आहे. इतकंच नाही, तर डोक्यावर असणारे पंखे केवळ शोभेच्या वस्तू बनले असून बहुतांश पंखे बंद अवस्थेत आहेत.

दुसरीकडे, बसस्थानकातील सुलभ शौचालयाची अवस्था इतकी भीषण आहे की, तिथल्या दुर्गंधीमुळे प्रवाशांना दोन मिनिटे उभे राहणेही कठीण झाले आहे. एसटी महामंडळ प्रत्येक प्रवाशाकडून 'स्वच्छता निधी'च्या नावाखाली तब्बल २ रुपये गोळा करते, मग प्रवाशांच्या खिशातून जाणारा हा पैसा नेमका जातो कुठे? हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सुरक्षेचा बोजवारा; टवाळखोरांचा सुळसुळाट जळगाव जामोद बसस्थानकाची दुरवस्था एवढ्यावरच थांबत नाही. सध्या हे बसस्थानक प्रवासी आणि गाड्यांपेक्षा मोकाट आणि निरुद्योगी लोकांचे हक्काचे आश्रयस्थान बनले आहे. दिवसाढवळ्या येथे टवाळखोरांचा सुळसुळाट वाढल्याने सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला आहे. यामुळे चोरीच्या आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सुरक्षेचा दावा करत लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे केवळ नावापुरतेच उरले आहेत. स्थानिक नागरिकांनी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी करूनही प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. जर प्रशासनाने तात्काळ या बसस्थानकाची सुधारणा केली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

The post एकेकाळी महाराष्ट्रात अव्वल ठरलेले जळगाव जामोद बसस्थानक आज अस्तित्वासाठी वेठीस; प्रशासनाचा ढिसाळ कारभार appeared first on Lokmanthan | लोकमंथन.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan