कर्जत : दादा पाटील महाविद्यालयात 'माझा वाढदिवस - माझे पुस्तक' या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ४११ पुस्तके ग्रंथालयाला भेट देत ज्ञानदानाची सुंदर परंपरा जपली आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उभारलेल्या 'गरीब विद्यार्थी फंडा'त तब्बल १९ लाख रुपयांची जमा झाली असून, त्याच्या व्याजातून अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ होत असल्याचे चित्र आहे.
महाविद्यालयात शिक्षणासोबत सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि माणुसकीची जोड देणारे विविध उपक्रम राबविले जात असून, त्यातून एक आगळावेगळा आदर्श निर्माण होत आहे. प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, शैक्षणिक व नैतिक मूल्यांची जोपासना होत आहे.
महाविद्यालयातील 'समान संधी केंद्रा'च्या माध्यमातून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. रयत शिक्षण संस्थेची बॅरिस्टर पी. जी. पाटील शिष्यवृत्ती, गणित विषयातील शिष्यवृत्ती तसेच इतर योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांची मदत विद्यार्थ्यांना मिळाली आहे.
यासोबतच 'कमवा व शिका' योजना, मोफत गणवेश वितरण, संशोधन व क्रीडा क्षेत्रातील प्रोत्साहनपर मदत यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे. या उपक्रमांचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत असून, वाढदिवसानिमित्त संस्कृती घुमरे यांनी ७ हजार रुपये तर यशराज क्षीरसागर यांनी २१०० रुपये 'गरीब विद्यार्थी फंडा'साठी देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
पालक संघाचे अध्यक्ष राहुल नवले यांनी या उपक्रमांचे कौतुक करत इतर पालक व विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले. अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी कार्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. नगरकर यांनी यावेळी केले.

