कुंडलवाडी : पोलीसांच्या सतर्कतेमुळे व प्रशासनाच्या समन्वयातून एक नियोजित बालविवाह रोखण्यात यश आले आहे. या कारवाईमुळे अल्पवयीन मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यात मदत झाली असून परिसरात या कार्याचे कौतुक होत आहे.
पोलीसांना दि.28 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे विळेगाव थडी (ता. धर्माबाद) येथे दि. 29 एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीचा विवाह आयोजित करण्यात आला आहे. तसेच 28 एप्रिल रोजी रात्री हळदी समारंभ होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर कुंडलवाडी पोलिसांनी तात्काळ हालचाल सुरू केली.
या प्रकरणाची माहिती तहसीलदार सुरेखा स्वामी व गटविकास अधिकारी क्षिरसागर यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार परमानंद गावंडे, ग्रामविकास अधिकारी व बालविवाह प्रतिबंधक अधिकारी खय्युम शेख, संरक्षण अधिकारी आनंद वडजे तसेच तलाठी, कोतवाल आणि महिला व बालविकास विभागाचे अधिकारी यांना पाचारण करण्यात आले. पोलीस स्टेशन कुंडलवाडी येथील सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर, पोलीस कर्मचारी रघुवीर चौहान, ज्ञानेश्वर डाकेवाड, रामेश्वर पाटील, महिला पोलीस कर्मचारी अरुणा श्रीवास्तव तसेच महिला व पुरुष होमगार्ड यांच्या दोन स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात आली. ही पथके विळेगाव थडी व संगम येथे पोहोचली असता दोन्ही ठिकाणी लग्न व हळदीच्या तयारी सुरू असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांना समुपदेशन (काऊन्सलिंग) करून बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याची जाणीव करून देण्यात आली. तसेच संबंधितांकडून वधूचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर व वराचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करण्यात येईल, असे लेखी हमीपत्र घेण्यात आले. प्रशासनाने दोन्ही पक्षांना कडक इशारा देत बालविवाह केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच मुलीचे वय पूर्ण होईपर्यंत तिच्यावर लक्ष ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दोन्ही कुटुंबांनी बालविवाह न करण्याचे आश्वासन दिले आहे. कुंडलवाडी पोलिसांची तत्परता व महसूल तसेच ग्रामविकास विभागाच्या सहकार्यामुळे हा बालविवाह रोखण्यात यश आले आहे. कुंडलवाडी पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, परिसरात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक 112 वर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्याला कळवावे. माहिती देणार्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

