Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मध्य प्रदेशातील नौका दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर

मध्य प्रदेशातील नौका दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर

भोपाळ : मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात नर्मदा नदीवरील बर्गी धरणात घडलेल्या पर्यटक नौकादुर्घटनेनंतर मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. रविवारी सकाळी शोधमोहीमेदरम्यान आणखी एका मुलाचा मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या 13 वर पोहोचली आहे.

अजून एक व्यक्ती बेपत्ता असून त्याचा शोध सुरूच आहे. ही दुर्घटना 30 एप्रिलच्या संध्याकाळी अचानक आलेल्या वादळ आणि मुसळधार पावसामुळे घडली. मध्य प्रदेश पर्यटन विभागाची पर्यटकांनी भरलेली नौका बर्गी धरणात बुडाली. या नौकेत सुमारे 47 पर्यटक प्रवास करत होते.
दुर्घटनेनंतर पहिल्या दोन दिवसांत बचावकार्य तीव्रतेने राबवण्यात आले. त्यावेळी 9 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर 29 जणांना सुरक्षित वाचवण्यात यश आले. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी दोन लहान मुलांचे मृतदेह सापडले. रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केल्यानंतर आणखी एका मुलाचा मृतदेह सापडला. मयूरन असे त्याचे नाव असून तो तमिळनाडू राज्यातील त्रिची येथील रहिवासी होता. तो कुटुंबासह जबलपूर येथे नातेवाईकांकडे आला होता. या दुर्घटनेतील मृतांमध्ये विविध राज्यांतील पर्यटकांचा समावेश आहे. नीतू सोनी, सौभाग्यम अलागन, मधुर मैसी, काकुलाझी, रेशमा सैयद, शमीम नकवी, मरीना मैसी, त्रिशान, ज्योती सेन, श्रीतमिल, विराज आणि मयूरन अशी मृतांची नावे आहेत. सध्या एक व्यक्ती अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, राज्य आपत्ती प्रतिसाद पथक आणि सैन्याचे जवान संयुक्तपणे कार्यरत आहेत. मृतांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे. तमिळनाडूतील मृत पर्यटकांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जबलपूर येथील डुमना विमानतळावरून विशेष मालवाहू विमानाद्वारे मृतदेह त्रिचीकडे रवाना करण्यात आले. इतर मृतांचेही पार्थिव त्यांच्या मूळ राज्यात पाठवण्याची तयारी प्रशासन करत आहे. या दुर्घटनेमुळे बर्गी धरण परिसरात शोककळा पसरली असून सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहेत. प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कार्गो विमानाने तामिळनाडूला पाठवले मृतदेह
बर्गी क्रूझ अपघातात जीव गमावलेल्या तामिळनाडूच्या पर्यटकांचे मृतदेह त्यांच्या मूळ राज्यात पाठवण्यात आले. जबलपूरच्या डुमना विमानतळावरून कार्गो विमानाने मृतदेह त्रिचीला रवाना करण्यात आले. सुरुवातीला तांत्रिक कारणांमुळे एका कार्गो विमानात अडचण आली, त्यानंतर मृतदेह दुसर्‍या विमानाने पाठवण्यात आले. मृतकांच्या कुटुंबीयांनीही सोबत प्रवास केला आहे. प्रशासनाकडून इतर मृतदेहही त्यांच्या मूळ राज्यांपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan