Monday, 25 Jan, 6.59 am लोकमंथन

होम
महागाईत तेल

जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे भाव आणि भारतातील भाव परस्परांशी संलग्न करण्यात आले आहेत. त्यामुळे इंधन दराशी देशातील सरकारचा काहीही संबंध ना...


जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे भाव आणि भारतातील भाव परस्परांशी संलग्न करण्यात आले आहेत. त्यामुळे इंधन दराशी देशातील सरकारचा काहीही संबंध नाही, असे सरकार सांगत असले, तरी ते अर्धसत्य आहे. त्याचे कारण जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे भाव जरी 55 डॉलरच्या पुढे गेले असले, तरी त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव 141 डॉलरपर्यंत गेले असताना पेट्रोलचे भाव नव्वद रुपयांच्या आसपास होते. पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीचा भाव आणि त्यावर केंद्र सरकार व विविध राज्यांनी लादलेले वेगवेगळे कर यामुळे इंधनाच्या सध्याच्या किंमती फुगलेल्या आहेत.

जागतिक बाजारात इंधनाच्या किंमती तीस डॉलरच्या आसपास असतानाही सरकारने त्याचा फायदा ग्राहकांना कधीच मिळू दिला नाही. एक देश, एक कराची भाषा केली जात असली, तरी इंधनाला मात्र अजूनही जीएसटीच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. राज्य सरकारांना अधिभार वाढवून उत्पन्नवाढीचा पर्याय सरकारने खुला ठेवला आहे. गेल्या जूनपासून सातत्याने महागाईच्या चढत्या आलेखाने केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेची काळजी वाढविली होती. गेल्या महिन्यांत मात्र महागाईचा आलेख खाली आला; परंतु त्यामुळे झालेला आनंद क्षणभंगूर ठरला. 29 दिवस इंधनाचे दर वाढले नव्हते. त्यामुळे समाधानी झालेल्या नागरिकांच्या खिशातून सध्या दररोज पैसे काढण्याचा चंग सरकारने बांधला आहे. आता इंधनाच्या दरवाढीने उच्चांक प्रस्थापित केला आहे. राजस्थानमध्ये पेट्रोलने शंभर रुपयांना स्पर्श केला आहे. महाराष्ट्रातही परभणीसारख्या जिल्ह्यात पेट्रोल शंभर रुपयांवर पोचले आहे. दररोज वीस-25 पैशाने इंधन महागते आहे. त्याचा परिणाम आता कारच्या विक्रीवर झाला आहे. सर्वसामान्य ग्राहकांचा विचार गेल्या महिन्यांत एकदाही झालेला नाही. कच्चे तेल घसरणीला लागले होते, तेव्हा 12 आठवडे देशातील तेल कंपन्या हात बांधून बसलेल्या होत्या. त्या काळात इंधनाचे दर बदललेच नाहीत. कोरोनानंतर आता कुठे भारताची अर्थव्यवस्था काहीशी सुधारण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारातील पेट्रोल, डिझेलच्या विक्रीतही वाढ होत होती; मात्र त्यातच सौदी अरेबियासह अन्य तेल उत्पादक देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारावर मोठा परिणाम होणार आहे. भारताची कच्च्या तेलाची गरज मोठी आहे. चीननंतर कच्चा तेलाचा ग्राहक देश म्हणून भारताचा दुसरा क्रमांक लागतो. त्यातच भारताला आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी एकूण 80 टक्के गरज आयातीतून भागवावी लागते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतींचा भारतावर थेट परिणाम होतो. सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फटका भारताला बसेल.

या आठवड्यात सौदी अरेबियाने कच्चा तेलाच्या उत्पादनात प्रतिदिन दहा लाख पिंपांची कपात केली आहे. दुसरीकडे ओपेक संघटनेच्या सदस्य देशांनी 97 लाख पिंपे उत्पादन कमी करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भारताला मोठा फटका बसणार आहे. कोरोनाचा जसा जगाच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला, तसाच तो आखाती देश आणि रशियासारख्या कच्च्या तेलाची निर्यात करणार्‍या देशांनाही बसला. 69 डॉलर प्रतिपिपांच्या खाली दर आले, तर संबंधित देशांना ते निर्यात करणे परवडत नाही. गेल्या दोन वर्षांपासून कच्च्या तेलाचे दर त्यापेक्षा कमी आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि तेल उद्योगातील गुंतवणुकीसाठी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय तेल उत्पादक देशांनी निर्णय घेतला असला. त्यामुळे भारत नाराज होणार असला, तरी त्याच्या नाराजीला काहीच अर्थ नाही. कच्च्या तेलाच्या दरांतील वाढीमुळे जनतेची नाराजी वाढते आहे. त्यामुळे लिटरमागे पाच रुपये सवलत देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेण्याचे सूतोवाच केले होते; परंतु प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. भारताला आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेसाठी काही पर्यायी उर्जास्त्रोतांवर काम करावे लागेल. तज्ज्ञांच्या मते आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी वाढ होईल. याची थेट झळ सर्वसामान्यांना बसणार आहे. असे असले, तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या तुलनेत भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमती खूप अधिक आहेत. त्याचे कारण भारतात पेट्रोल, डिझेलवर लादण्यात येणार्‍या करांचे प्रमाण खूप अधिक आहे. सध्या भारतात पेट्रोल डिझेलच्या किमतीत 21 रुपयांच्या कराचा भार आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे सरकार जनतेला आणखी धक्का देण्याच्या तयारीत आहे. कोरोनाच्या लसीकरणामुळे 65 हजार कोटी रुपयांचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. तिजोरीला पडलेला हा खड्डा भरून काढण्यासाठी केंद्र सरकार पुन्हा जनतेच्याच खिशात हात घालणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर केंद्र सरकार कोविड सेस लावू शकते. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा भडका उडाला आहे. असे असताना पेट्रोल आणि डिझेलवर कोरोना सेस लावण्याच्या सरकारच्या निर्णयाने सामान्यांच्या खिशाला आणखी ताण येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्पात कोरोना सेसची घोषणा करू शकतात. केंद्र सरकारचा तिजोरी भरलेली ठेवण्याचा प्रयत्न आहे. देशाची अर्थव्यवस्था पहिल्यांदाच मंदीतून जात असल्याने अतिरिक्त कर लादल्यास अडचणी वाढू शकतात. केंद्र सरकार सरसकट कोरोना सेस लावण्याऐवजी जादा उत्पन्न गटातील लोकांवर कर लादू शकते किंवा पेट्रोल आणि डिझेलवर कोरोना सेस लावू शकते. व्यापारी हा बोजा ग्राहकांवरच टाकत असल्याने ग्राहकाला इंधन दरवाढ आणि महागाई असा दुहेरी फटका बसतो आहे.

कोरोनामुळे होणारा आकस्मिक खर्च भरून काढण्यासाठी ही दरवाढ असल्याचे सरकार सांगते आहे. प्रत्यक्षात इंधनाच्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशात धूर निघत असताना सरकार मात्र धनवान होण्यात मग्न आहे. महागाईचा फटका लघू व्यावसायिकांनाही बसत आहे. परदेशातून येणारे इंधन महाग होत आहे. इंधन दरवाढीमुळे धान्य, डाळी, भाजीपाला आधी जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडत आहेत. एकूणच दरवाढीवर अंकुश लावणे गरजेचे झाले आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष पुरवणे महत्त्वाचे आहे. यात सर्वसामान्य जनतेला न सहन होणारा मोठा आर्थिक फटका बसत आहे. सरकारी धोरणाप्रमाणे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर आणि परदेशी चलनाचा विनिमय दर विचारात घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. या कंपन्यांना दरनिश्‍चितीचे अधिकार दिलेले असले, तरी त्यात केंद्र सरकारची महत्त्वाची भूमिका असते आणि ती नाकारता येत नाही. विविध विकासकामे आणि योजनांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारला पैसा हवा आहे आणि ही उणीव किंवा कमतरता भरून काढण्यासाठी अन्य कोणताही कर आता लावणे सरकारला शक्य राहिलेले नाही. कारण असे केल्यास सरकारची लोकप्रियता घसरू शकते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातूनच अधिकाधिक कमाई करणे सरकारला सोयीस्कर वाटते. जसजसे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात तसतशी सरकारची कमाईही वाढत असते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan
Top