Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महाराष्ट्र देशातच नव्हे तर जगात AI चे नेतृत्व करेल; मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास 'मुंबई टेक वीक २०२६' चे थाटात उद्घाटन; १० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य

महाराष्ट्र देशातच नव्हे तर जगात AI चे नेतृत्व करेल; मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास 'मुंबई टेक वीक २०२६' चे थाटात उद्घाटन; १० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य

मुंबई : महाराष्ट्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे, तर जगात एआयचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार येथे व्यक्त केला.

मुंबईतील बीकेसी (BKC) येथे ‘मुंबई टेक वीक २०२६’ चे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई मनपा आयुक्त अश्विनी भिडे, महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, तसेच प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने १० हजार कोटी रुपयांची एआय गुंतवणूक, दीड लाख रोजगार निर्मिती, सहा ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ आणि विशेष ‘एआय इनोव्हेशन क्षेत्रे’ उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एआय क्षेत्रातील संशोधन आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य सरकार ‘कंप्युटर-अज-अ-सर्व्हिस’ सुविधा निर्माण करत आहे. त्याद्वारे नवउद्योजक आणि संशोधकांना २ हजार जीपीयूस (GPUs) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उच्च क्षमतेची कम्प्युटिंग सुविधा परवडत नसल्यास नवकल्पना थांबतात; त्यामुळे महाराष्ट्र शासन थेट पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सरकार फक्त धोरणात्मक चौकट तयार करू शकते; पण खरी स्टार्टअप परिसंस्था संस्थापक आणि उद्योजक घडवतात. सलग तीन वर्षे महाराष्ट्र हा गुंतवणूक आणि स्टार्टअप संख्येनुसार देशातील अग्रगण्य राज्य ठरले आहे. तंत्रज्ञान आणि एआय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम काळ असून महाराष्ट्र ही सर्वोत्तम कार्यभूमी आहे, असे आवाहनही त्यांनी देशाविदेशातील कंपन्यांना केले.

‘महा-विस्तार’ ॲप शेतकऱ्यांसाठी ‘वन स्टॉप सोल्यूशन’ राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये एआयच्या वाढत्या वापराची उदाहरणे देताना मुख्यमंत्र्यांनी ‘महा-विस्तार’ या शेतकरी ॲपचा विशेष उल्लेख केला. हे शेतकऱ्यांसाठी एक ‘वन स्टॉप सोल्यूशन’ आहे. भारत एआय परिषदेत केंद्र सरकारने त्याला देशातील सर्वोत्तम शेतकरी उपाय म्हणून गौरविले आहे. आता ‘इंडिया-विस्तार’ संकल्पना याच धर्तीवर विकसित होत आहे. तसेच बांधकाम परवानगी प्रक्रियेत एआय आधारित प्रणालीमुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हे तपास आणि न्यायप्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या ‘क्राइम ओएस’ प्लॅटफॉर्मचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रणालीमुळे तपास, दोषारोपपत्र (चार्जशीट) तयार करणे आणि न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत वेगवान होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan