Thursday, 08 Apr, 2.35 pm लोकमंथन

होम
महाराष्ट्रामुळे कोरोनाविरोधातील लढाईला धक्का : डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली : देशात कोरोना साथरोगाची दुसरी लाट आली असताना देशातील सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आढळून येताहेत. यापार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य ...

नवी दिल्ली : देशात कोरोना साथरोगाची दुसरी लाट आली असताना देशातील सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आढळून येताहेत. यापार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन गोयल यांनी महाराष्ट्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. राज्य सरकार कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका डॉ. हर्षवर्धन यांनी केली.


याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की, करोनावरील लसीच्या तुटवड्याचे महाराष्ट्र सरकारचे आरोप धादांत खोटे आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून आपण गेल्या वर्षभरापासून बघतोय, महाराष्ट्र सरकार ढिसाळपणे काम करत असून करोना व्हायरसविरोधी लढाईत प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राची चालढकल सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या या उदासिन भूमिकेमुळे करोना व्हायरसविरोधातील लढाईत सुरू प्रयत्नांना धक्का बसला आहे, असा गंभीर आरोप हर्षवर्धन यांनी केला आहे. आरोग्य कर्मचारी असो की फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण महाराष्ट्र सरकारची कामगिरी फार काही कौतुकास्पद राहिलेली नाही. महाराष्ट्र सरकार नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्याचे सोडून खंडणीच्या वसुलीत गुंतले आहे, हे अतिशय धक्कादायक असल्याची टीका हर्षवर्धन यांनी केली. यावेळी हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राबरोबरच छत्तीसगड सरकारच्या आरोपांचा समाचार घेतला. छत्तीसगडमधील नेते चुकीची माहिती पसरवत असून लसीकरणाबाबत भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. छत्तीसगड सरकारने अशा परिस्थितीत गलिच्छ राजकारण करण्यापेक्षा आपल्या राज्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर भर द्यावा, असा टोला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लगावला.केंद्र सरकारच्या डीसीजीआयने लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देऊनही छत्तीसगड सरकारने कोवॅक्सिन लस घेण्यास नकार दिला आहे. छत्तीसगड सरकारमधील नेतेच लसीवर संशय व्यक्त करत आहेत. लसीबाबत शंका घेणारे हे जगातील एकमेव सरकार असेल, अशी टीका हर्षवर्धन यांनी केली.


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan
Top