Dailyhunt
महिलांनी प्रशिक्षणातून व्यवसाय उभा करावा; शालिनी विखे पाटील ; जनसेवा फाउंडेशन अंतर्गत महिलांना प्रशिक्षण

महिलांनी प्रशिक्षणातून व्यवसाय उभा करावा; शालिनी विखे पाटील ; जनसेवा फाउंडेशन अंतर्गत महिलांना प्रशिक्षण

लोणी : महिलांनी प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभा करावा व आत्मविश्वास वाढवावा, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी केले.

जनसेवा फाउंडेशन, लोणी व पंचायत समिती राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिलांच्या ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

यावेळी जनसेवा फाउंडेशनच्या संजला लांडगे, बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या विस्तार विभाग प्रमुख डॉ. प्रियंका खर्डे, प्रशिक्षिका स्वाती लड्डा, अंगणवाडी पर्यवेक्षिका सोनाली कुंजीर यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.

विखे पाटील म्हणाल्या, जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना विविध प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी मतदारसंघासह अहिल्यानगर जिल्ह्यात महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेत व्यवसायवृद्धीवर लक्ष केंद्रित करावे व ग्राहकांच्या गरजा ओळखून सेवा द्यावी.

जनसेवा फाउंडेशनमार्फत आतापर्यंत ४० हजारांहून अधिक महिलांना विविध प्रशिक्षणांद्वारे स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महिला बचत गटांच्या माध्यमातूनही व्यवसायनिर्मितीला चालना देण्यात येत असून एकल महिलांसाठी विशेष उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत स्वतःचा व्यवसाय वाढवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रारंभी संजला लांडगे यांनी फाउंडेशन व कृषी विज्ञान केंद्रामार्फत सुरू असलेल्या विविध प्रशिक्षणांची माहिती दिली. प्रशिक्षिका स्वाती लड्डा यांनी प्रशिक्षणातून आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले. तसेच आशा कडसकर, सविता उंडे, निकिता फणसे, प्राजक्ता ब्राम्हणे यांनी मनोगत व्यक्त केले.

या प्रशिक्षणात शिर्डी मतदारसंघातील ६१ महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना व्यवसाय किटचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रियंका खर्डे यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan