पुणे : पर्यटक व्हिसावर भारतात येऊन धार्मिक प्रचार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तीन अमेरिकन नागरिकांविरोधात कडक कारवाई केली आहे. व्हिसा अटींचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या तिघांना 'लीव्ह इंडिया' नोटीस बजावण्यात आली असून, त्यांना 10 मे 2026 पर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तिघे 53, 65 आणि 66 वर्षे वयोगटातील असून ते 19 ते 21 एप्रिलदरम्यान पर्यटक व्हिसावर भारतात दाखल झाले होते. त्यानंतर ते पिंपरी-चिंचवड परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. 27 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास हे तिघे पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात फिरत असताना त्यांनी एका खासगी कॅब चालकाला थांबवून संवाद साधला. या वेळी त्यांनी त्या चालकाला बायबल आणि ख्रिश्चन धर्मासंबंधित इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील पत्रके देत धर्मप्रसाराचा प्रयत्न केल्याचे समोर आले.
घडलेला प्रकार संशयास्पद वाटल्याने संबंधित कॅब चालकाने तात्काळ जवळच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्परतेने तिघांना ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्यांच्या जवळ मोठ्या प्रमाणात धार्मिक प्रचार साहित्य आढळले. पुढील तपास परदेशी नोंदणी कार्यालय मार्फत करण्यात आला.
चौकशीत हे स्पष्ट झाले की, पर्यटक व्हिसावर भारतात येऊन कोणत्याही प्रकारचा धार्मिक प्रचार करणे हे व्हिसा नियमांच्या विरोधात आहे. त्यामुळे इमिग्रेशन आणि फॉरेनर्स कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी परदेशी नोंदणी कार्यालयाच्या अधिकार्यांनी तिघांनाही अधिकृत नोटीस देत निर्धारित मुदतीत देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी स्पष्ट केले की, व्हिसाच्या अटींचे उल्लंघन केल्यास अशा प्रकारची कारवाई पुढेही करण्यात येईल. तपासादरम्यान हेही समोर आले की, संबंधित नागरिक यापूर्वीही विविध प्रकारच्या व्हिसावर भारतात येत होते. मात्र, त्यांच्या भेटीमागील उद्देश सातत्याने धार्मिक प्रचाराशी संबंधित असल्याची शक्यता अधिकार्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर परदेशी नागरिकांनी भारतात येताना व्हिसाच्या अटींचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचा संदेश पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

