पाथर्डी : वाढीव व्याज व आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून 'समर्थ क्रॉप केअर' या कंपनीने शहरातील अनेकांची कोटींच्या घरात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एजंट आणि गुंतवणूकदार यांच्यातील वादातून झालेल्या हाणामारीनंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले असून तपासात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणातील कंपनीचा संचालक प्रशांत गवळी (रा. पुणे) याच्याविरोधात यापूर्वीच पुणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. आता पाथर्डी येथील गुंतवणूकदारांचीही फसवणूक झाल्याने संबंधित गुन्हा येथेही दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गवळी याने सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आपल्या कंपनीत पैसे गुंतवण्याचे आवाहन केले होते. साखळी पद्धतीने इतरांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्यास अधिक व्याज व कमिशन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाल्याने अनेकांनी विश्वास ठेवून लाखो रुपयांची गुंतवणूक केली.
या साखळी पद्धतीच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर पैसे जमा झाल्यानंतर काही गुंतवणूकदारांना प्रलोभन म्हणून दुबई सहलीचेही आयोजन करण्यात आले होते. सुमारे एक ते दीड वर्ष हा व्यवहार सुरळीत सुरू होता. मात्र त्यानंतर एजंटांना कमिशन व गुंतवणूकदारांना व्याज मिळणे बंद झाल्याने संशय निर्माण झाला.
दरम्यान, ज्यांनी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले त्या एजंट व गुंतवणूकदारांमध्ये वाद वाढू लागले. दोन दिवसांपूर्वी अशाच एका वादातून हाणामारी झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेले असता सखोल चौकशीत शहरातील सुमारे ४० ते ५० जणांनी एक ते सोळा लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्याचे उघड झाले. एकूण रक्कम दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज असून तपासादरम्यान हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेल्या अनेक गुंतवणूकदारांचा धार्मिक पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

